मुस्लीम महिलांमध्ये जागरुकता यावी : अजमल कमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:02 PM2018-06-15T21:02:33+5:302018-06-15T21:02:33+5:30
महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले...
पुणे : तिहेरी तलाकच्या मुद्दयावर राजकीय पातळीवर काही होईल, अशी अपेक्षा करण्यापेक्षाही मुस्लीम महिलांमधूनच विरोधी आवाज उठला पाहिजे. मुस्लीम महिला जागृत झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे अशक्य आहे, असे मत नवी दिल्ली येथील सार्क विद्याापीठामध्ये संशोधन करणारे अभ्यासक अजमल कमाल यांनी गुरुवारी व्यक्त केले.
हमीद दलवाई स्टडी सर्कलतर्फे आयोजित कार्यक्रमात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या ‘इंधन’ या कादंबरीचा ऊर्दू अनुवाद करून पाकिस्तानमध्ये प्रकाशन करणारे अजमल कमाल आणि ‘मोदीखान्याच्या दोन गोष्टी’ व ‘बिनसावल्यांच्या गावात’ या लघुपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शिका गौरी पटवर्धन या दांपत्याशी संवाद साधण्यात आला. प्रा. शमसुद्दीन तांबोळी, प्रा. बेनझीर तांबोळी आणि बशीर शेख यावेळी उपस्थित होते.
कमाल म्हणाले, मुस्लिमांप्रती कळवळा असलेल्या काँग्रेसने काही केले नाही. शहाबानो प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोटगीचा आदेश दिलेला असतानाही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले नाही. तर, मोदी का करतील? महिलांची स्थिती चांगली व्हावी, असा कोणाचाच विचार नसल्यामुळे काही बदल होणार नाही. शरियतमध्ये बदल झाला नाही. सरकारला राज्यघटनेमध्येच बदल करावा लागला होता. तिहेरी तलाक संपविण्याची चळवळ झाली पाहिजे. अशी चळवळ शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. पाकिस्तानामध्ये मोजक्या महिलांनी शरियतच्या आधारे नव्हे तर शिक्षणाच्या जोरावरच सर्वोच्च स्थान संपादन केले आहे.