‘जाणीव’ ही जिद्दी आयुष्याची प्रेरणादायी कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:20+5:302021-01-25T04:13:20+5:30
पुणे : ‘कर्करोगासारख्या असाध्य आजाराशी सामना करत असताना आपल्या भावनांना शब्दरूप देणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ‘जाणीव’ हे ...
पुणे : ‘कर्करोगासारख्या असाध्य आजाराशी सामना करत असताना आपल्या भावनांना शब्दरूप देणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे ‘जाणीव’ हे आत्मकथन म्हणजे वेदनेला दिलेले सर्जनशील कोंदण आहे आणि त्याचवेळी ती जिद्दी आयुष्याची प्रेरणादायी कहाणी आहे,’’ असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
सुभाष कोटस्थाने यांनी लिहिलेल्या ‘जाणीव’ या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी लेखक सुभाष कोटस्थाने, उषा कोटस्थाने, दिनानाथ रुग्णालयाचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सचिन हिंगमिरे, सचिन व्यवहारे, पत्रकार पराग पोतदार, श्याम भुर्के, माधव खानवेलकर, वंदना पंडित-सेठ उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘कर्करोगासारख्या आजाराचा सामना करताना अनेकदा माणूस गर्भगळीत होतो. अशा वेळी आपल्या पूर्वायुष्याविषयी लिहावंसं वाटणं आणि ती गोष्ट प्रत्यक्षात नेणे ही महत्त्वाची बाब आहे. या आत्मकथनाद्वारे इतरांना ‘जाणीव’ देण्याचा प्रयत्न लेखनातून केला आहे त्यामुळे वैयक्तिक अनुभवाचे संचित म्हणून या लेखनाकडे न पाहता अशा संकटांना कशापद्धतीने सामोरे जायचे याची प्रेरणादायी कहाणी म्हणून पाहायला हवे.’’
कोटस्थाने म्हणाले, ‘‘कर्करोगाच्या वेदनेपेक्षा ज्या बालपणीच्या आठवणी मला अधिक त्रास देत होत्या त्या गतआयुष्याला शब्दरूप देऊन माझे मन आता हलके झाले आहे. भविष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याचा निश्चय मी केलेला आहे.’’
शब्दांकनकार पराग पोतदार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रिया बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. उषा कोटस्थाने यांनी आभार मानले.
चौकट
‘दीनानाथ’ला १० लाखांचा निधी
या प्रसंगाचे औचित्य साधून सुभाष कोटस्थाने यांचे वडील गंगाधर कोटस्थाने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिनानाथ रुग्णालयाला १० लाख रुपये देण्यात आले. या सोहळ्यात दिनानाथ रुग्णालयाचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सचिन हिंगमिरे आणि तेथील व्यवस्थापनाची धुरा सांभाळणारे सचिन व्यवहारे यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला.
फोटो ओळी :‘जाणीव’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) पत्रकार पराग पोतदार, उषा कोटस्थाने, प्रा. मिलिंद जोशी, लेखक सुभाष कोटस्थाने.