कचऱ्याविषयी जनजागृती व्हावी : विक्रम नाबर; ‘सागरकिनाऱ्यावरील जीवन’ चित्रबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:15 PM2018-02-07T12:15:05+5:302018-02-07T12:17:41+5:30
आजकाल समुद्रकिनारपट्टीवर आपल्याला कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत आहे, याविषयी जनजागृती करायला हवी’’ असे मत इंजिनिअर क्षेत्रातील अग्रगण्य प्रा. डॉ. विक्रम नाबर यांनी व्यक्त केले.
पुणे : ‘‘आपल्या भारताला सुंदर अशा मोठ्या समुद्रकिनारपट्टीची देणगी मिळाली आहे. आपल्या देशासारखी किनारपट्टी दुसऱ्या कुठल्या देशाला मिळणे अशक्य आहे. परंतु, आजकाल समुद्रकिनारपट्टीवर आपल्याला कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत आहे, याविषयी जनजागृती करायला हवी’’ असे मत इंजिनिअर क्षेत्रातील अग्रगण्य प्रा. डॉ. विक्रम नाबर यांनी व्यक्त केले.
सोसायटी आॅफ इंडियन मरिन आर्टिस्टच्या वतीने कमोडर राजन वीर यांनी बालगंधर्व येथे आयोजित केलेल्या ‘सागर किनाऱ्यावरील जीवन आणि सागरातील जहाजे’ या चित्रप्रदर्शनात ते बोलत होते. या वेळी वीणा चांदवरकर, डॉ. रिमा मेनोन, (निवृत्त) कमोडर राजन वीर आदी उपस्थित होते. समुद्रकिनाऱ्यावरील घरे, किल्ले, मंदिरे, स्मारके, मच्छीमारी करणाऱ्या खेडेगावाचा परिसर, सागरातील जहाजे अशा विलोभनीय, मनाला ताजे व प्रसन्न करणारे चित्रे या प्रदर्शनामध्ये दाखविण्यात आली आहेत.
यामध्ये ज्येष्ठ चित्रकार नंदकिशोर धाडणेकर, लता धाडणेकर, होश्नार कैकोबाद, सीमा घिया, प्रतीक टंडन, सतीश कर्वे तसेच, वैशिष्ट्य म्हणजे १३ वर्षीय बालचित्रकारांचाही सहभाग यामध्ये असून, अॅक्रिलिक व वॉटर कलर अशा विविध माध्यमांद्वारे काढलेल्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.