पुणेरी पाट्यातून नागरिकांचे प्रबाेधन ; पुणे पाेलिसांचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 08:25 PM2019-06-14T20:25:21+5:302019-06-14T20:26:28+5:30
पुणे पाेलीस आयुक्तालयात पुणेरी पाट्या लावण्यात येणार असून, या पाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
पुणे : पुणेरी पाट्यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. कमीत कमी शब्दात माेठा आशय सांगण्याची खासियत पुणेरी पाट्यांमध्ये दिसून येते. मार्मिक शब्दांमध्ये एखादा संदेश, सूचना समाेरच्यापर्यंत या पाट्यांच्या माध्यमातून पाेहचवली जाते. याच पुुणेरी पाट्यांची भुरळ आता पुणे पाेलिसांना पडल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये वाहतूकीचे नियम व इतर नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पाेलीस आता पुणेरी पाट्यांचा उपयाेग करणार आहेत. त्यासाठी विविध सूचनांच्या पुणेरी पाट्या तयार करुन घेण्यात आल्या असून सध्या त्या पाेलीस आयुक्तालयात लावण्यात आल्या आहेत.
या पाट्यांचे उद्घाटन पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. भारतीय कला प्रसारणीच्या मदतीने या पाट्या तयार करण्यात आल्या आहेत. याबाबत बाेलताना व्यंकटेशम म्हणाले. साेशल मीडियाच्या आधीपासून पुण्यात पुणेरी पाट्यांची संस्कृती आहे. त्यामुळे पुणेकरांना नियमांचं महत्त्व पटवून देण्यासाठी या संस्कृतीचा आधार घ्यावा असे वाटले. ही कल्पना मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये त्यांनी या पाट्या तयार केल्या. याला आमच्या अधिकाऱ्यांबराेबरच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नकाे बंड, नकाे दंड हेल्मेट घालुन, डाेक ठेवु थंड , वाईटाची कराल संगत तर जेल मध्येच मिळेल पंगत. हेल्मेट नसे त्याशी यमराज दिसे. पुरुष आणि स्त्री असा काेणताही भेदभाव नसलेला सेल म्हणजे भराेसा सेल. जेव्हा 100 टक्के गरज असेल तेव्हा 100 नंबरचा वापर करा. लाेकांना आपल्यामुळे त्रास झाल्यास आपल्यालाही कायद्याप्रमाणे त्रास हाेईल. चाेवीस तास ड्युटीवरच स्वारी, पाेलिसांची गड्या गाेष्टच न्यारी. अशा अनेक पाट्या आयुक्तालयात लावण्यात आल्या आहेत.