‘ट्रायल रूम’ने केली जागरूकता
By admin | Published: April 10, 2015 05:39 AM2015-04-10T05:39:00+5:302015-04-10T05:39:00+5:30
‘ट्रायल रूममध्ये जाताय राहा सावध’ ‘लोकमत’च्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे पडसाद शहरात उमटले.
पिंपरी : ‘ट्रायल रूममध्ये जाताय राहा सावध’ ‘लोकमत’च्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे पडसाद शहरात उमटले. विविध महिला संघटना तसेच सजग नागरिकांनी याची दखल घेतली. शिवसेना महिला आघाडीच्या गटनेत्या सुलभा उबाळे व पदाधिकाऱ्यांनी मिळून मॉलमधील चेजिंग रुमची पाहणी केली. तसेच शहरातील मॉलच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले. महिला सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करावा, उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
शहरातील मॉलमधील सुरक्षेची पाहणी लोकमत टीमने केली. ट्रायल रूम असुरक्षित आहेत, याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला संघटनांनी ‘लोकमत’च्या जागरूकतेबद्दल धन्यवाद दिले.
शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील फु गेवाडी, काळेवाडी, आकुर्डी, मोरवाडी, पिंपरी या दुकानांची आणि मॉलची पाहणी केली. दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत ही पाहणी सुरू होती. त्यात गटनेत्या उबाळे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या सुशीला पवार, वेदश्री काळे, वैशाली मराठे, मंगला घुले, शशिकला उभे, स्वरूपा खातेकर, जनाबाई गोरे, वंदना गायकवाड, बेदी सय्यद, शारदा वाघमोडे, पुष्पा तारू, रागिणी प्रभू, ललिता सोलंकी, निर्मला पाटील, अनित तुतारे, मंगला भोकरे, नंदा दातरकर, सुधा नाईक, सुनंदा सावंत, संगीता उत्तेकर यांनी मॉलची पाहणी केली. शिष्टमंडळाने छुपे कॅमेरे तसेच महिला सुरक्षा रक्षक कशा प्रकारे काम करत आहेत, याची पाहणी केली.
काही मॉलचालकांनी अरेरावीची भाषा वापरली. कायदे हातात कशाला घ्यायचे, असेही कार्यकर्त्यांना सुनावले. मोरवाडी येथील मॉलच्या मालकांसह सुरक्षारक्षक महिलांनी लोकमतच्या जागरूकतेबद्दल आभार मानले. महिला सुरक्षेची खरी गरज आहे, असे सुरक्षारक्षक महिलांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या निवेदनाची दखल घेतली जाईल. सुरक्षा व्यवस्था ही वाढविण्यात येईल, असे मॉल चालकांनी या वेळी शिष्टमंडळास सांगितले. दरम्यान काही मॉल चालकांनी मॉलमधील सुरक्षेची माहितीही शिष्टमंडळास दिली.
उबाळे म्हणाल्या, ‘‘महिलांच्या सुरक्षेबाबत ‘लोकमत’ने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. जागरूकतेबद्दल महिला वर्गाच्या वतीने धन्यवाद द्यायला हवेत. मॉलमधील
ट्रायल रूममधील छुप्या कॅमेऱ्यामुळे अनेक गैरप्रकार घडू शकतात.
महिला व मुलींनी जागरूक असायला हवे. महिला सुरक्षेबाबत सूचनाही केल्या आहेत.’’(प्रतिनिधी)