अजब कारभार..! धायरीत रूंदीकरण केलेल्या रस्त्यांवर महापालिकेतर्फे वृक्षारोपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:18 PM2018-07-16T17:18:30+5:302018-07-16T17:22:38+5:30

राज्य सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ६० हजार वृक्षांची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण असा प्रकार सध्या सुरू आहे.

Awesome management ..! Plantation by Municipal corporation on widening roads | अजब कारभार..! धायरीत रूंदीकरण केलेल्या रस्त्यांवर महापालिकेतर्फे वृक्षारोपण 

अजब कारभार..! धायरीत रूंदीकरण केलेल्या रस्त्यांवर महापालिकेतर्फे वृक्षारोपण 

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व क्षेत्रीय कार्यालय व प्रभाग अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचे आदेशत्यासंबधी स्थानिक नागरिकांनी विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे

पुणे: अतिक्रमणांनी अरूंद झालेल्या रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या धायरीकरांना ही अतिक्रमणे निघाल्यामुळे थोडातरी दिलासा मिळाला. मात्र, त्यावर प्रशासनाने लगेचच पाणी टाकले आहे. रस्ता रूंद करून तिथे डांबरीकरण केलेल्या जागेवर वृक्षारोपणासाठी खड्डे खणण्यात आले आहेत.
राज्य सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील ६० हजार वृक्षांची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. ती पूर्ण करण्यासाठी सध्या सगळी क्षेत्रीय कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रभागनिहाय, क्षेत्रनिहाय वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू असून त्यात अगदी आवर्जून किती वृक्ष लावले त्याची संख्या देण्यात येत आहे. १०० पेक्षा कमी वृक्ष लावण्यास कुणी देखील तयार नाही. त्यामुळे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण असा प्रकार सध्या सुरू आहे.
धायरीकडे जाणारा धायरी फाट्यापासूनचा रस्ता तब्बल ८० फुटांचा आहे. मात्र, सध्या तो ४० फुटांपेक्षाही कमी आणि काही ठिकाणी तर अगदी ३० फूट इतकाच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांच्या पुढे अतिक्रमण केले आहे. काहींनी शेड टाकून ते पक्के केले आहे तर काहींनी तात्पुरते वापरण्यास सुरूवात केली आहे. जिथे दुकानदाराचे अतिक्रमण नसेल तिथे पथारीवाले आपला माल घेऊन दिवसभर व संध्याकाळीही बसतात. त्यामुळे रोजच सकाळी व सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेला या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होत असते. ही बाब लक्षात घेऊनच काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. त्यात काही ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आली. ती पुन्हा होऊ नये यासाठी त्या जागेवर लगेचच डांबरीकरणही करण्यात आले. आता याच जागेवर खड्डे खोदून वृक्षांची रोपे लावली जात आहेत. ती वाढलीच तर रस्ता पुन्हा अरूंद होणार आहे हे लक्षात न आल्यासारखेच हे काम सुरू आहे. डांबर ओतून हे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासंबधी स्थानिक नागरिकांनी विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सरकारने दिलेले ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी मुख्य कार्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना व त्यांनी त्यांच्या कक्षेतील प्रभाग अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त वृक्ष लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रभागस्तरावर या एकमेव कार्यक्रमाची लगबग सध्या सुरू आहे. 
............
रूंदीकरण झालेल्या रस्त्यावर डांबर टाकलेला भाग खोदून तिथे वृक्षांची रोपे लावण्याचा प्रकार महापालिकेतच होऊ शकतो. याबाबत दोन वेळा तक्रार केली, तर कर्मचाऱ्यांनी साहेबांनीच सांगितले आहे असे खास उत्तर दिले. साहेबांशी म्हणजे प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्कच झाला नाही. खड्डे पुन्हा बूजवून रस्ता मोकळा करावा व झाडे लावायचीच असतील तर ती रस्त्याच्या मागे दूरवर लावावीत.
महेश महाले, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते
-----------------
रस्ता अरूंद होणार नाही 
रुंदीकरण झालेल्या जागेवर असे खड्डे खोदले जाणार नाहीत. कर्मचाऱ्यांनी चुकीचे ऐकले असावे किंवा चुकीच्या जागेवर खड्डे खोदले असावेत. याची माहिती घेऊन नागरिकांच्या म्हणण्यानुसार ते सांगतील त्या जागेवरच वृक्ष लागवड केली जाईल. रस्ता अरूंद होऊ देणार नाही.
अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक 

Web Title: Awesome management ..! Plantation by Municipal corporation on widening roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.