‘आव्वाज’ ढोलताशांचाच, विविध मंडळांचे मनसोक्त वादन; बाप्पा मोरयाचा अखंड उद्घोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:17 AM2017-09-07T00:17:20+5:302017-09-07T00:17:34+5:30
रात्री बाराच्या सुमारास स्पीकर बंद करण्यात आल्यानंतर, अनेक रस्त्यांवरील गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती; मात्र लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी वाढत गेली.
पुणे : रात्री बाराच्या सुमारास स्पीकर बंद करण्यात आल्यानंतर, अनेक रस्त्यांवरील गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती; मात्र लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी वाढत गेली. स्पीकर बंद असल्याने लक्ष्मी रस्त्यावर सिटी पोस्टाजवळ, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्याकडून येणारी मंडळे थांबविण्यात आलेली होती. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावर ढोल ताशा पथकांचे दणक्यात वादन सुरू होते.
समर्थ पथक, शिवगर्जना, शिवप्रताप, रुद्रगर्जना, शिवमुद्रा, श्रीराम पथक, स्वरूपवर्धिनी, आदिमाया, आवर्तन, श्री गजलक्ष्मी, नादब्रह्म, नूमवि पथक, शिव साम्राज्य, सूर्य पथक, उगम पथक, शिवताल, ताल, कलावंत, रमणबाग, कामायनी, शौर्य, चेतक, हिंद तरुण मंडळ आदी पथकांनी लक्ष्मी रस्त्यावर मनसोक्त वादन केले.
रात्रीच्या शांत वातावरणात गणपती बाप्पा मोरयाचा उद्घोष आणि ढोलताशांचा आसमंत भेदणारा ताल हे यंदाच्या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य होते. एकापाठोपाठ येणाºया वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुकांमुळे लक्ष्मी रस्त्याच्या वैभवात आणखीनच भर पडली. ‘ढोलावर आदळणारे टिपरू आणि ताशावर विजेच्या वेगाने पडणाºया काड्या’ आणि त्यामधून निर्माण होणाºया ठेक्यावर नाचणारे ध्वज, नागरिकांच्या टाळ्या, वादकांना दिले जाणारे प्रोत्साहन, वादकांचे पारंपरिक वेष, महिला वादकांच्या डोक्यावर आकर्षक फेटे, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर
यामुळे वातावरणाची निर्मिती झाली होती.
लक्ष्मी रस्त्यावर आनंदोत्सवाचे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आकर्षक फुलांच्या रथात विराजमान झालेले गणराय...गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांच्या गर्दीने फुललेले रस्ते...ढोलताशा पथकांचा गजर, डीजेचा दणदणाट..गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा वातावरणात लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक २५ तास ५ मिनिटे रंगली. मिरवणुकीचा आनंदोत्सव ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच लक्ष्मी रस्त्यावर गर्दी केली होती.
लोखंडे तालीम, साखळीपीर तालीम मंडळ, नगरकर तालीम मित्र मंडळ, जनाई पवळे संघ, होनाजी तरुण मंडळ, नातूबाग मंडळ, शनिपार मंडळ, विजय क्रिकेट क्लब, जय बजरंग मित्रमंडळ, श्री दत्त तरुण मंडळ, शिवशक्ती मंडळ, गणपती चौक मित्रमंडळाचा लक्ष्मी रोडचा राजा, बाल विकास मंडळ, सराफ सुवर्णकार गणपती ट्रस्ट, जय बजरंग मित्रमंडळ, मुंजाबाचा रोड तरुण मंडळ आदी मंडळांनी देखणे विसर्जन रथ आणि आकर्षक देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंजाबाचा बोळ तरुण मंडळाने सर्कशीतील खेळांचा जिवंत देखावा सादर केला होता. या देखाव्याने चिमुरड्यांचे लक्ष वेधून घेतले. एकीकडे सर्कशीचे खेळ लोप पावत असताना आणि मुले सोशल मीडिया, गेमच्या आहारी जात असताना या खेळाचे महत्त्व या जिवंत देखाव्यातून अधोरेखित झाले.
रथाच्या मध्यभागी हलता जोकर, विविध खेळ करणारे माकड, थरारक प्रात्यक्षिके करणाºया तरुणी आदींचा या देखाव्यामध्ये समावेश होता. चिमुकल्याला खांद्यावर बसवून मिरवणूक दाखवणारे आई-बाबा आणि कुतूहलाने विदुषकाकडे पाहून चमकणारे चिमुरड्यांचे डोळे असे चित्र या वेळी पाहायला मिळाले.