पालकांवर शुल्कवाढीची कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:20 AM2021-02-18T04:20:11+5:302021-02-18T04:20:11+5:30
नामांकित शाळा : तत्काळ शुल्क भरण्याच्या केल्या सूचना पुणे : पुणे शहरातील काही नामांकित शाळांनी शुल्कवाढ करून पालकांना तत्काळ ...
नामांकित शाळा : तत्काळ शुल्क भरण्याच्या केल्या सूचना
पुणे : पुणे शहरातील काही नामांकित शाळांनी शुल्कवाढ करून पालकांना तत्काळ शुल्क भरण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांवर आता शुल्कवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे. परंतु, विद्यार्थी व पालकांना शुल्कासाठी वेठीस धरणाऱ्या शाळांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षण विभागातर्फे दिला आहे.
कोरोनाकाळात राज्यातील शाळा बंद केल्या. त्यामुळे शाळांसमोर केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याचा पर्याय उरला. त्यानुसार शहरातील अनेक नामांकित शाळांनी विविध ऑनलाईन व्यासपीठाचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू केले. परंतु, कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेले, व्यवसाय बुडाला. त्यामुळे केवळ ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणाऱ्या शाळांनी कमी शुल्क आकारावे, अशी मागणी पालकांनी केली. तसेच राज्य शासनाने सुद्धा शुल्कासाठी पालकांकडे तगादा लावू नये, असे परिपत्रक प्रसिद्ध केले. शासनाने काढलेल्या परिपत्रकावर काही शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने संबंधित परिपत्रकाला स्थगिती दिली. त्यामुळे शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी केली जात आहे.
वारजे-माळवाडी भागातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पुढील शैक्षणिक वर्षासाठी सुमारे १५ टक्के शुल्कवाढ केली आहे. तसेच दुसरीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा द्यायची असेल, तर त्याला इयत्ता तिसरीतील प्रवेशासाठी आकारले जाणारे शुल्क आधीच भरावे लागेल, असा अजब फतवा शाळेने काढला आहे. त्यामुळे पालक गोंधळून गेले आहेत. कोरोनाकाळात शुल्क कमी करण्याऐवजी शाळांकडून शुल्कवाढ केली जात असल्याने पालकांवर आर्थिक बोजा पडत आहे.
वारजे माळवाडी परिसरातील एका शाळेने आपल्या पाल्याचा पुढच्या वर्गात प्रवेश करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज भरून द्यावा, असे पालकांना ई-मेल द्वारे कळविले. तसेच पुढील वर्षाच्या वाढीव शुल्काची माहितीही दिली. त्याचप्रमाणे काही दिवसांनी पुन्हा ई-मेल पाठवून पूर्वी दिलेल्या शुल्कामध्ये आणखी वाढ झाल्याचे कळवले. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
---
बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांना वेठीस धरता येणार नाही. वाढीव शुल्क भरले तरच परीक्षेला बसता येईल, नियमानुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य