पुणे-सातारा महामार्ग कामाच्या दिरंगाईला अॅक्सिस बॅंक दोषी; नितीन गडकरींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:34 PM2021-02-13T16:34:46+5:302021-02-13T16:56:33+5:30
सातारा रस्त्याचे काम मार्चअखेर पूर्ण होईल..!
पुणे : पुणे- सातारा महामार्गाच्या कामाला उशीर झाल्याप्रकरणी आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी अॅक्सिस बॅंक दोषी असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर या बॅंकेवर कारवाई करण्याबाबतचे पत्रही त्यांनी पुण्याचे ग्रामीण पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.
पुण्यामध्ये आज नितीन गडकरी यांनी चांदणी चौक उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी शहरात होणारे इतर उड्डाणपुल आणि हायवे या संदर्भातही उत्तरे दिली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सातारा रस्त्यावर होणाऱ्या नवले पुलाजवळच्या अपघातांबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिक वाहन चालवताना उतार असल्याने न्युट्रलवर गाड्या चालवतात आणि त्यामुळेच हे अपघात होतात असा दावा अधिकाऱ्यांनी केला. गडकरींनी मात्र या सगळ्यासाठी आवश्यक उपाययोजना काय सुचवल्या गेल्या आहेत त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.
सातारा रस्त्याचे काम मार्च अखेर पूर्ण होईल....
सातारा रस्त्याचे काम मार्च अखेर पूर्ण होईल, असे सांगतानाच त्यांनी या कामातल्या दिरंगाईला अॅक्सिस बॅंक जबाबदार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हणले आहे. सातारा हायवेसाठी अॅक्सिस बॅंकेकर्ड दिले होते. टोलची संपूर्ण रक्कम ते त्यांच्याकडे जमा करुन घेत होते. ती रक्कम कंत्राटदाराला दिलीच गेली नाही. यामुळे या सगळ्या कामाला उशीर झाला आहे. याबद्दल मी अॅक्सिस बॅंकेवर कारवाई करावी असे पत्र जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना लिहिले आहे.
बॅंकेवर जरी कारवाई केली जाणार असली तरी कंत्राटदार असणाऱ्या रिलायन्सचं काय याबाबत विचारलं असता कारवाई केल्यावर कोर्ट केस होते आणि त्यात दिरंगाई होते. त्यामुळे कारवाई न करता काम पूर्ण करण्याकडे लक्ष असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. या रस्त्यावर चार पुलांचे काम सुरु असून ते मार्च अखेर संपेल असा दावाही केला.
दरम्यान, टोलबाबत विचारलं असता रस्ता झालाय तर टोल भरावाच लागेल. चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही दोणार नाही.त्या कंत्राटदारांना अजुनही पैसे मिळाले नाहीयेत. नाहीतर काम कसे पूर्ण होणार असंही गडकरी म्हणाले. एकुणच तारीख पे तारीख मध्ये अडकलेल्या सातारा हायवेच्या कामाला आता अजुन एक नवी तारीख मिळाली आहे. आता या नव्या मुदतीत तरी काम पूर्ण होणार का पाहावे लागेल असेही यावेळी गडकरींनी स्पष्ट केले.