देशातल्या ३७ छावणी रुग्णालयात 'आयुर्वेदिक उपचार'; खडकी, देहूरोड रुग्णालयांमध्येही मिळणार सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:39 PM2022-03-31T15:39:43+5:302022-03-31T15:42:04+5:30
उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय...
पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून (Ministry of Defence) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील छावणी रुग्णालयातील (cantonment hospital) रुग्णांना आयुर्वेदातील पारंपरिक उपचारांचा (ayurvedic treatment) लाभ देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये देशातील ३७ छावणी रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील खडकी (khadki cantonment hospital) आणि देहूरोड (dehu road cantonment hospital) या दोन छावणी रुग्णालयांचाही समावेश केला गेला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच छावणी परिसरातील निवासी आणि सामान्य नागरिकांना आयुर्वेदिक उपचार मिळणार आहेत. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने या उपक्रमासाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे.