विद्याधाम कान्हूर मेसाईला आयुष प्रसाद यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:58+5:302021-06-16T04:14:58+5:30
शाळेच्या सर्व परिसराची पाहणी करून, विद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, ...
शाळेच्या सर्व परिसराची पाहणी करून, विद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, प्रसिद्ध उद्योजक केरभाऊ नाणेकर उपस्थित होते.
आपल्या छोटेखानी पण मौलिक भाषणात आयुष प्रसाद म्हणाले की, शाळेच्या पहिल्याच दिवशी भेट देण्याचा योग आला व एक सुंदर शाळा अनुभवायला मिळाली याचा आनंद झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, शिक्षण उपायुक्त हारूण आत्तार, उद्योजक केरभाऊ नाणेकर यांसारखे विद्यार्थी घडविणारी ही एक आदर्श शाळा आहे. शिक्षकांचे प्रथम कर्तव्य विद्यार्थी घडविणे हे आहे. शाळा बंद पण शिक्षण चालू अशी जिल्हा परिषदेची संकल्पना आहे. शिक्षकांनी योग्य पद्धतीने अभ्यासक्रम शिकविताना नवनवीन कल्पना व आधुनिकता जोपासली पाहिजे. शिष्यवृत्ती ठराविक मुलांना न मिळता, सर्वांनाच का मिळू शकत नाही, याचा विचार करून गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या अधिकाराचा बडेजाव न करता मैत्रीपूर्ण रीतीने शिक्षक व सेवकांना मार्गदर्शन केल्यामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा विद्यालयाचे वतीने सत्कार केला. प्रकाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर पर्यवेक्षक साहेबराव आंधळे यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : १५कान्हूर मेसाई आयुष प्रसाद
फोटोओळ... कान्हूर मेसाई शालेय परिसराची व प्रत्येक विभागाची पाहणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यालयाची परिपूर्ण माहिती घेतली.