सेंट मीरा महाविद्यालयात ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:40+5:302021-04-10T04:09:40+5:30
आपण लवकरच भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण करणार आहोत. ह्या अंतर्गत भारत सरकारने “आझादी का अमृत महोत्सव” ...
आपण लवकरच भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण करणार आहोत. ह्या अंतर्गत भारत सरकारने “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्याचे घोषित केले. याबरोबरच दांडीयात्रेला ९१ वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या निमित्ताने पुणे येथील सेंट मीरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात आला.
या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन ह्यांच्या समन्वयातून आगाखान पॅलेस येथे उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील ५ स्वयंसेविकांनी सहभाग नोंदवला. तसेच महाविद्यालयामध्ये ह्या कार्यक्रमांतर्गत व्हर्चुअल चित्र प्रदर्शन आयोजित केले गेले, ज्यात कला शाखेतील विद्यार्थिनीनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणे आणि त्यांचे महत्त्व ह्यावर चित्राद्वारे सादरीकरण केले. तर दुसऱ्या उपक्रमांतर्गत वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांच्या कार्याबद्दल सादरीकरण केले. निबंध स्पर्धेचे विषय देऊन आयोजन करण्यात आले. शिवाय एक परिषददेखील आयोजित करण्यात आली, ज्यात श्रद्धा चौहान यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित घटनांचे, स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांच्या कार्याबद्दल वर्णन केले. एकूण ह्या अमृतमहोत्सवात प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या मिळून ८७ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गुलशन गिडवानी,
उप - प्राचार्या शालिनी अय्यर ह्यांचे सहकार्य मिळाले आणि ह्यास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी मंजिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम अधिकारी डॉ. संध्या पंडित ह्यांनी करून दिला आणि आभार शेरिन जॉर्ज हिने मानले.