दिलासादायक! बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 12:30 PM2022-05-29T12:30:55+5:302022-05-29T12:34:00+5:30
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असं आवाहन टोपे यांनी केलं.
पुणे/ जालना- पुण्यात प्रथमच ओमायक्रॉन या कोरोना विषाणुचा उपप्रकार असलेल्या बी ए. ४ चे चार आणि बीए. ५ या व्हेरिएंटचे तीन असे सात रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांपैकी ४ पुरुष तर ३ महिला रुग्ण होते. मात्र या सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ज्या नागरिकांचे दोन डोस झालेले नाही त्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे, तसेच बूस्टर डोस घ्यावा, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं. सध्या राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी मास्क बंधनकारक करणं गरजेचं नसल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
सदर सर्व रुग्ण पुणे शहरातील आहेत आणि ४ मे ते १८ मे या कालावधीतील आहेत. यातील चारजण ५० वर्षांवरील आहेत, तर दोनजण २० ते ४० वर्षे या वयोगटातील आहेत, तर एकजण १० वर्षांखालील आहे. यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका, बेल्जियम प्रवासाचा इतिहास आहे, तर तीनजणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या मुळ विषाणुमध्ये उत्परिवर्तन होत असते. आपल्याकडे याआधी दुसरी लाट डेल्टा या विषाणुमुळे तर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे तिसरी लाट आली होती. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ हे विषाणुंचे प्रमाण अधिक होते. हे दोन्ही उपप्रकार आधी भारतात आढळून आले होते. मात्र, आता त्यामध्ये आणखी उत्परिवर्तन झाले असून त्यापासून बी ए. ४ आणि बीए. ५ त्यामध्ये हे दोन्ही विषाणुप्रकार तयार झाले असून ते अधिक संसर्गजन्य आहेत. या नव्या व्हेरिएंटमुळे दक्षिण अफ्रिकेत पाचवी लाट आली आहे.