"बा...विठ्ठला" यंदा तरी आषाढी पायीवारी घडू दे ! वारकऱ्यांचे विठुरायाला साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:24 PM2021-05-12T13:24:32+5:302021-05-12T13:33:47+5:30
कोरोनाचे सावट : माऊलींचा प्रस्थान सोहळा अठ्ठेचाळीस दिवसांवर; वारकऱ्यांना प्रतीक्षा
भानुदास पऱ्हाड -
आळंदी : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अठ्ठेचाळीस दिवसांवर येऊन ठेपलेला यंदाचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा लाखों वारकाऱ्यांसमवेत 'वैभवी' प्रस्थान ठेवणार का ? किंवा मागील वर्षी प्रमाणे यंदाही मोजक्या वीस वारकाऱ्यांसह बसने पंढरीला जाणार ? या संभ्रमावस्थेत सर्व वारकरी मंडळी आहेत.
यंदा तुकोबांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे १ जुलैला देहूतून तर ज्ञानोबांच्या पालखीचे २ जुलैला आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू असून 'संचारबंदी' कायम आहे. तर सर्व धार्मिक स्थळेही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत.
मागील वर्षीही शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच संतांचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा रद्द केला होता. वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या जबाबदारीवर प्रमुख निवडक संतांच्या चलपादुका मर्यादित वीस वारकऱ्यांसमवेत बसने पंढरीला विठुचरणी नेण्यात आल्या होत्या.
वास्तविक कोरोना हद्दपार करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे वारकरी संप्रदायातील प्रत्येक घटकाने काटेकोर पालन करून आषाढीवारी घरीच राहून साजरी केली. त्यामुळे यंदातरी 'तुकोबा - माऊलीं'च्या सहवासातून पंढरीला जाण्याची वारकाऱ्यांची मनोमन इच्छा आहे. मात्र यंदाही कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाकडून सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. परिणामी यंदाच्या पायीवारी सोहळ्यावरही कोरोनाचे सावट दिसून येत असले तरीसुद्धा "बा... विठ्ठला यंदा तरी पायीवारी घडू दे" ! अशी विनवणी वारकाऱ्यांकडून केली जात आहे.
दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला पंढरपूरात माउलींच्या पायीवारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम निश्चित केला जातो. मात्र मागील वर्षी प्रमाणे यंदाही पंढरीची चैत्र वारी रद्द केल्याने वारीपूर्व तयारी प्रलंबित आहे.
संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या भगवंत पांडूरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यातून विविध संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरीला जातात. विविध संतांचा प्रस्थान सोहळा जवळ आल्याने शासन सोहळ्याबाबत काय निर्णय घेईल? तसेच वारीचे नियोजन आणि स्वरुप कसे असेल? याकडे सर्व वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.
प्रस्थान तारखा...
१) संत मुक्ताई पालखी सोहळा : १४ जून
२) संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा : २४ जून
३) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा : १ जुलै
४) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : २ जुलै
५) संत सोपानकाका पालखी सोहळा : ६ जुलै
" यंदाच्या माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी गुरुवारी (दि.१३) वारी संबंधित सर्व घटकांसमवेत ऑनलाइन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्वांची मते जाणून वारीचे स्वरूप ठरवले जाईल.
- डॉ. अभय टिळक, प्रमुख विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी.