‘‘बा अन् आय दोघं कचरा वेचतात’’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:29 AM2018-05-31T07:29:46+5:302018-05-31T07:29:46+5:30
सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय
पुणे : सकाळी लवकर उठून, कचरा गोळा करण्यासाठी निघायचं, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता पोरांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी विजय आणि अश्विनीच्या आई-वडिलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा काढून जिवापाड कष्ट केले. कचरा गोळा करून या
दोन्ही पालकांनी मोठ्या हिमतीने आपल्या मुलांना शिकवत उज्ज्वल भविष्याची आस त्यांच्या मनात तेवत ठेवली आहे.
नुकत्याच बारावीच्या जाहीर झालेल्या निकालात विजयने ८९ टक्के तर अश्विनीने ५५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या दोघांच्या आई-वडिलांना जेव्हा आपल्या मुलांच्या निकालाची बातमी कळली, त्या वेळी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
विजयचे वडील पवनानगर (धनकवडी ) येथे राहतात. त्यांच्याकडे एक स्वत:ची गाडी असून, तिचा उपयोग ते कचरा भरण्यासाठी करतात. सकाळी उठायचं, मिनिडोअर गाडी काढायची, आणि परिसरातील घरांमध्ये जायचे. तिथला कचरा घ्यायचा. तो गाडीत टाकायचा. हे दिवसभरातले काम. महिन्याला एका घराला ५0 रुपये मिळतात. अशी २५0 घरे आहेत. विजयने सुरुवातीपासूनच स्वअध्ययनावर भर दिला. त्याच्या अंगी मुळातच हुशारी होती. त्यामुळे त्याला वेगळ्या शिकवणुकीची गरज पडली नाही. महाविद्यालयात जे काही शिकवले जायचे, त्यावरच लक्ष केंद्रित करून त्याने अभ्यास केला. आपले आईवडील काय करतात याची जाणीव त्याला असल्याने जसे शक्य होईल त्यानुसार अभ्यास करण्यावर विजयने भर दिला. विशेष म्हणजे अकरावीच्या वर्गातदेखील विजय पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. विजयचे वडील सांगतात, ‘‘मला पण मोठा सरकारी अधिकारी व्हायचे होते. परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. घरची गरिबी, अभ्यासाला पुस्तके नाही. तशा अवस्थेतदेखील दहावीपर्यंत मजल मारली. आता विजयला पुढे शिकवायचे आहे. त्याची जिद्द मोठी आहे. कष्ट करण्याची तयारी आहे.’’ विजयने या वेळी सुटीच्या
काळात पुढील शिक्षणासाठी पैसे कमविण्यासाठी नारळपाण्याचा स्टॉल सुरू केला. २ महिने त्याने ते काम करून पैसे जोडले. साक्षी नाडे
हिचे आईवडील देखील कचरावेचक असून तिनेदेखील अथक
प्रयत्नाने बारावीला ८१ टक्के गुण प्राप्त केले आहे.
आई आणि वडील या दोघांना जेवढं शक्य होतं त्या बळावर ते आम्हाला शिकवतात. त्यांच्या कष्टांना उत्तरायी होण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची तयारी करावी लागेल. वडिलांचे स्वप्न सरकारी अधिकारी व्हायचे होते. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. बारावीपर्यंत कुठल्या क्लासेसची गरज पडली नाही. स्वअध्ययनावर भर होता. पुढे तर मदतीची अपेक्षा आहेच. तसे झाल्यास स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आणखी वाढेल.
- विजय कदम
अश्विनीचे आईवडीलदेखील कचरावेचक आहेत. ती वारजे माळवाडी येथील रामनगर येथे राहते. वडील विलास निर्मळ यांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवले. वास्तविक वह्या, पुस्तके यांसारख्या इतर विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कराव्या लागणाºया जीवघेण्या संघर्षाची कल्पना अश्विनीला आहे. पुढील शिक्षणाला काही मदत झाली तर ठीक; नाहीतर स्वबळावर पदवीधर होऊन आईवडिलांना हातभार लावेल.
- भावना अश्विनी