‘बाप माणसां’ची लावताहेत वाट : शरद पोंक्षे : ‘बाप माणूस’चे पुण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:22 PM2018-01-08T12:22:33+5:302018-01-08T12:25:22+5:30
विध्वंसक संघटनांकडून इतिहासातल्या ‘बाप माणसां’ची वाट लावण्यात येत आहे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. मंजूषा आमडेकर लिखित ‘बाप माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी पोंक्षे बोलत होते.
पुणे : इतिहासाचा शून्य अभ्यास असणारे लोक सध्या छातीठोकपणे इतिहास सांगत आहे. यातून चुकीचा इतिहास निर्माण केला जात आहे. अशा चुकीच्या इतिहासाला साक्ष मानत देशात सर्वच बाप माणसांच्या म्हणजेच महापुरुषांच्या नावाने गलिच्छ राजकारण सुरू आहे. कोरेगाव भीमा इथे जे काही घडले त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. समाजातील विध्वंसक संघटनांकडून इतिहासातल्या ‘बाप माणसां’ची वाट लावण्यात येत आहे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
मंजूषा आमडेकर लिखित ‘बाप माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन कर्वे रस्त्यावरील स्वामिकृपा हॉल येथे करण्यात आले. त्या वेळी पोंक्षे बोलत होते. या कार्यक्रमाला नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, बाळकृष्ण जोशी, उद्योजक मंदार केळकर, आनंद कृष्णाजी कोंडकर, मंजूल प्रकाशन हाऊसचे चेतन कोळी आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात आमडेकर लिखित व अनुवादित अनुक्रमे मन्नो व हॅरी पॉटरच्या काही भागांचे प्रकाशन करण्यात आले.
मंजूषा आमडेकर म्हणाल्या, हे पुस्तक माझे वडील बाळकृष्ण जोशी यांच्यावर आधारित आहे. आयुष्यात संघर्ष प्रत्येकजण करत असतो. परंतु यांचे जीवन म्हणजे एक अभिनव प्रयोगशाळा आहे. त्यांनी या प्रयोगांद्वारे संकटावर मात केली.’
पोंक्षे म्हणाले, कोरेगाव भीमा इथे जे काही घडले ते अत्यंत वाईट व दुर्दैवी आहे. परंतु, तिथे घडलेल्या इतिहास व संघर्षाची कोणतीही पार्श्वभूमी माहिती नसताना दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे निंदनीय व समाजाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असा इतिहास लिहिणाºया व सांगणाऱ्या लोकांना सत्य इतिहासाचे लेखन करत प्रत्युत्तर दिले पाहिजे.