PUNE : बाबा आढाव यांचे उद्यापासून आत्मक्लेश उपाेषण
By राजू इनामदार | Published: November 26, 2024 08:32 PM2024-11-26T20:32:41+5:302024-11-26T20:40:37+5:30
निवडणुकीच्या ऐन तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे, अशी टीका त्यांनी केली.
पुणे : देशात संविधान आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी वयाच्या ९४व्या वर्षांतदेखील आत्मक्लेश उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. संविधान दिन साजरा साजरा करत असतानाच महात्मा जाेतिबा फुले स्मृतिदिनी अर्थात गुरुवारी (दि. २८) हे उपोषण केले जाणार आहे.
महात्मा जाेतिराव फुले समता प्रतिष्ठानतर्फे महात्मा फुले समता भूमीत राज्यघटनेचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. आपले काही सहकारी आत्मक्लेश उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती डाॅ. आढाव यांनी दिली. स्वतंत्र भारताच्या १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून प्रत्येक निवडणूक पाहत आलो. बराच काळ त्याचा एक भागही होते. आता सुरू असलेला भ्रष्टाचार याआधी कधीही पाहिला नाही. निवडणुकीच्या ऐन तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे, अशी टीका त्यांनी केली. यातून तरी लोकांना जाग यावी, त्यांनी या व्यवस्थेचा विरोध करावा, अशी अपेक्षाही डॉ. आढाव यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
ॲड. मोहन वाडेकर, नितीन पवार, हनुमंत बहिरट, चंदन कुमार, ओंकार मोरे, प्रकाश वाघमारे, शीतल परदेशी, विजयानंद रांजणे, विजय जगताप, रमेश उणेचा यावेळी उपस्थित होते. संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले.