Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 05:41 PM2024-11-30T17:41:40+5:302024-11-30T17:42:09+5:30

वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते, हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे

baba adhav you withdraw the movement mahavikas aghadi will take the movement forward - Uddhav Thackeray | Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे

पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी गुरूवारी सकाळपासून आत्मक्लेष उपोषण सुरू केल आहे. आताच्या निवडणुकांचा संदर्भ देऊन लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेधार्थ महात्मा फुले पुण्यतिथीदिनी असे आंदोलन करणार असल्याचे डॉ. आढाव यांनी संविधानदिनी जाहीर केले होते. आमदार छगन भुजबळ, रोहित पवार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी डॉ. आढाव यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. 

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत यांनी आढाव यांची भेट घेऊन आत्मक्लेश उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे. महाविकास आघाडीतील शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी बाबांना दिले. उद्धव ठाकरेंच्या विनंतीला मान देत अखेर बाबा आढावांनी पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. 
 
ठाकरे म्हणाले, आजचा दिवस लक्षात राहणारा आहे. बाबा आढाव हे प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांची प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातुन सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात एक मोठा विषय इ व्ही एम चा आहे. माझे मत कोठे जाते हे समजायला हवे. शेवटच्या एका तासात 76 लाख मते का वाढली? असा सवाल यावेळी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एवढं राक्षसी बहुमत असुन देखील महाराष्ट्रात आनंद का नाही. बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पुजा - अर्चा करण्यासाठी का जातायत. अमावस्येला पुजा अर्चा करण्यासाठी गेलेत यावरुन यांची मानसिकता दिसुन येते‌.  महाराष्ट्र लेचा पेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा देईल. हेच जर आमच्या बाबतीत असंत तर राष्ट्रपती राजवट लागली असती. अशी टीका यावेळी त्यांनी केली. 

Web Title: baba adhav you withdraw the movement mahavikas aghadi will take the movement forward - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.