बारामती, इंदापूरमध्ये बाबासाहेबांना अभिवादन
By admin | Published: April 15, 2015 11:14 PM2015-04-15T23:14:48+5:302015-04-15T23:14:48+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीदिनानिमित्त इंदापूरकरांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
इंदापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीदिनानिमित्त इंदापूरकरांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
सकाळी नऊ वाजता डॉ. आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने आंबेडकरनगर येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने शहरातून सवाद्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत पुणे - सोलापूर महामार्गावरुन रॅली नगरपरिषदेच्या मैदानात आली. त्या ठिकाणच्या डॉ. आंबेडकर व छ. शिवराय यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
नगराध्यक्ष अशोक इजगुडे व उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे व नगरसेवक उपस्थित होते. नगरपरिषदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवराय व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरील मेघडंबरीचे काम नगरपरिषदेने डॉ. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पूर्ण केले. रात्रीच विद्युतरोषणाई केली होती. सकाळी परिसर स्वच्छ केला होता.
जयंतीनिमित्त येथील भीमाई आश्रमशाळेत संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे, माजी नगरसेविका शकुंतला मखरे या उभयतांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
या वेळी बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्याध्यापक साहेबराव पवार, समीर मखरे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.
बारामतीत मिरवणूक
बारामती : बारामती शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी आंबेडकरी भक्तांचा सागर लोटला होता. यामध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या मिरवणुकीस सिद्धार्थनगरमधून सुरुवात झाली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी मंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या वेळी पूजापाठाचा कार्यक्रम झाला. येथील संघर्ष युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘भीम महोत्सव २०१५’चे आयोजन करण्यात आले होते.
मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाच्या कार्यक्रमांचेही यामध्ये आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे, सुभाष ढोले, नगरसेविका ज्योती बल्लाळ, सुनीता चव्हाण, सविता लोंढे, यास्मिन बागवान, पौर्णिमा तावरे, प्रियंका चव्हाण, दत्तात्रय लोंढे, इम्तियाज शिकिलकर, सुधीर सोनवणे, योगेश जगताप, संजय लालबिगे, राजेंद्र वनकर, राजेंद्र ढवाण, सुनील
शिंदे, नवनाथ बल्लाळ, नीलेश
मोरे, काळुराम चौधरी, विष्णुपंत चव्हाण, गौतम लोंढे आदी उपस्थित होते.
कैलास चव्हाण, विजय गव्हाळे, भारत अहिवळे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात
आले होते. दीपक अहिवळे,
शैलेश सोनवणे, मोहन शिंदे, शुभम अहिवळे, गणेश सोनवणे यांनी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)