"...म्हणून जाणता राजा नाटक बघताना पुलंनी मागितली होती बाबासाहेबांची माफी"
By अतुल चिंचली | Published: July 29, 2021 12:43 PM2021-07-29T12:43:56+5:302021-07-29T17:30:56+5:30
महानाट्यातील कलाकारांच्या भावना; २०० ते ३०० कलाकारांच्या एकत्रित शक्तीच्या आधारे महानाट्याचे प्रयोग पार पडत असे
पु.ल. देशपांडे एकदा जाणता राजा नाटक पाहायला आले होते. पण त्यांना नाटक पूर्ण पाहता आले नाही. याबद्दल पुलंनी बाबासाहेबांची माफी मागितली. पुल म्हणाले, नाटकातले प्रसंग इतके खरेखुरे वाटत होते. की माझ्या डोळ्यात सातत्याने अश्रू येत होते. त्यामुळे मला अश्रूंमुळे धूसर दिसू लागले आणि मी नाटक पूर्ण पाहू शकलो नाही. इतके खरेखुरे महाराज आणि त्यांचे स्वराज्य माझ्यासमोर नाटकातून अवतरले होते.
आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त लोकमतने जाणता राजा महानाट्यात काम करणाऱ्या कलाकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या कलाकारांनी आठवणींना उजाळा दिला आहे. त्यापैकी एक पुलंची आठवण एका कलाकाराने सांगितली
जाणता राजा हे महानाट्य पाहताना खरोखरच आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज अवतरले असल्याची अनुभूती येते. हे महानाट्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी समाजसमोर आणले. महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा, मोघलांची हार, मावळ्यांची एकी, युद्ध प्रसंग, वेषभूषा, आणि नैपथ्य पाहून लेखक, दिग्गजांचेही अश्रू अनावर झाले. २०० ते ३०० कलाकारांच्या एकत्रित शक्तीच्या आधारे महानाट्याचे प्रयोग पार पडत असे. अशाही आठवणी महानाट्यात काम केलेल्या कलाकारांनी सांगितल्या आहेत.
संपूर्ण जगात या महानाट्याचे हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग झाले तरी भारतातही अनेक राज्यांत हिंदी भाषेत जाणता राजा नाटक होत असे. १९८४ ला जाणता राजाचा पहिला प्रयोग झाला होता. बाबासाहेब इंग्लडमध्ये गेल्यावर त्याठिकाणी पाहिलेले मोठमोठे पुतळे, प्रतिमा यावरून नाट्यप्रयोगाची कल्पना सुचली. ते अमलात आणण्यासाठी एक कुशल संघटक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.
जाणता राजा या महानाट्यात सर्वांना प्रवेश दिला जात असे. त्यांनी या महानाट्यासाठी सात ते आठ हजार लोकांचे एक कुटुंब तयार केले. कलाकारांकडून कधी चुका झाल्या तर चारचौघांत ओरडले नाहीत. पण जाणूनबुजून केलेल्या चुकीला त्यांनी कधीच माफ केले नाही, अशी शिस्तबद्ध शिकवण त्यांच्याकडून अनुभवायला मिळत असल्याचे कलाकार म्हणतात.
नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्रतील अनेक जिल्हयात फिरायला मिळत असे. देशातील बऱ्याच राज्यात जाण्याची संधीही कधी हुकवली नाही. नागपूर मधील रामटेक, कोल्हापूर मधील पन्हाळगड, पुरंदर, राजगड, शिवनेरी असे किल्ले, तसेच पर्यटन स्थळेही पाहायला मिळत होती. इतिहास - भूगोलाचा अभ्यास नाटकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिला. जगण्याची पद्धत, कुटुंबाची शिस्तप्रियता याची सवयही बाबासाहेबांनी लावून दिली होती.
मावळे, अष्टप्रधान मंडळी, महाराज, मोघल, सहकारी, वासुदेव, गोंधळी, शेतकरी अशा लहानांपासून मोठ्या व्यक्तिरेखांचा अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच नाटकातील लहानशी चूक त्यांच्या पटकन लक्षात येत असे. ती वेशभूषेच्या बाबतीत असो वा अभिनय, नैपथ्य यासंदर्भात असो. प्रयोगात कुठल्याही पात्राची कमतरता भासल्यास बाबासाहेब स्वतः ते पात्र साकारत असत.
नाटकातले प्रसंग
- रमणबाग शाळेतील एका प्रयोगात वासुदेव हे पात्र करणारा व्यक्ती येऊ शकला नाही. त्याच क्षणी बाबासाहेबांनी कुठलाही विचार न करता तातडीने वासुदेवाचा अंगरखा चढवला. डोक्याला मोरपीस लावून ते रंगमंचावर आले.
- शाहिस्तेखानाच्या कव्वालीच्या प्रसंगात कव्वाली करणाऱ्याची वेशभूषा चुकली होती. पण ती लोकांच्या निदर्शनास आली नाही. बाबासाहेब त्यावेळी रंगमंचाच्या समोर बसले होते. त्यांना मात्र ही गोष्ट लक्षात आली. प्रसंग संपताच बाबासाहेब रंगमंचाच्या खालून स्टेजच्या मागे गेले. कव्वाली करणाऱ्या कलाकाराला त्याची चूक दाखवली.
कार्यशाळेत बाराबंदी - फेटा बांधण्याबरोबरच पगडी कशी घालावी हेही बाबासाहेबांनी शिकवले. तर धोतर नेसण्याची खरी पद्धत त्यांनीच आम्हाला शिकवली. मावळ्यांनी मुजरा कसा करावा यापासून छत्रपतींच्या अभिनयापर्यंत सगळीकडे बाबासाहेब लक्ष देत असे. देशभरातून ७ ते ८ हजार लोकांना एकत्र आणून बाबासाहेबांनी जाणता राजा महानाट्य बसवले आहे.