बाबासाहेबांची भेट म्हणजे इतिहासाचा नवा साक्षात्कार : राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:25+5:302021-07-30T04:10:25+5:30
पुणे : “बाबासाहेबांनी आज वयाची शंभरी गाठली आहे. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज कायम आहे. वयामुळे शरीर जरा थकलेले आहे. ...
पुणे : “बाबासाहेबांनी आज वयाची शंभरी गाठली आहे. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज कायम आहे. वयामुळे शरीर जरा थकलेले आहे. पण त्यांचे बोलणे, स्मरणशक्ती आणि संदर्भ देण्याची हातोटी पूर्वीसारखीच आहे. ज्या ज्या वेळी मी बाबासाहेबांना भेटतो, त्या त्या वेळी इतिहासाचा पुन्हा नव्याने साक्षात्कार होतो,” असे गौरवोद्गार मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काढले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरुवारी (दि. २९) शंभराव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेत त्यांना भगवी शाल, पगडी आणि गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देत शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांच्या चरणी माथा टेकवून त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलले.
ठाकरे म्हणाले, “बाबासाहेबांनी लेखनातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानात जे सापडले आणि जे खरे आहे, तेच लोकांसमोर मांडले. एखादी दंतकथा असेल तर ते तसे सांगतात. कथेला आधार नाही, असाही आवर्जून उल्लेख करतात. सांगणे हे त्यांचे काम असून जाणून घेणे, आपले काम आहे.”