घोंगडी व्यावसायासाठी बाबीर यात्रा हक्काची बाजारपेठ; हजारो नगांची विक्री, कोट्यवधींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 02:39 PM2023-11-21T14:39:20+5:302023-11-21T14:39:34+5:30
आधुनिक युगात वुलनचा वापर वाढत असला तरी बाबीर यात्रा उत्सवात हातमागावरील घोंगडीचे महत्व कायम
सतीश सांगळे
कळस : रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर यात्रा उत्सव हा घोंगडी व्यवसायासाठी हक्काची बाजारपेठ मानला जातो तीन दिवस चाललेल्या या यात्रेत सुमारे १२० व्यावसायिकांनी आपल्याकडील सुमारे १० हजार नगाची विक्री केली पाचशे रुपयापासून दोन हजारापर्यंत नगाची किमत होती. वुलनचा वापर वाढत असला तरी आधुनिक युगात हातमागावरील घोंगडी चे महत्व कायम आहे. त्यामुळे यात्रा काळात या व्यवसायात कोट्यवधी रुपयाची उलाढाल झाली आहे.
पारंपारिक घोंगडी व्यवसाय हा अजूनही काळानरूप टिकून आहे. मात्र या व्यवसायाला यात्रा हीच हक्काची बाजारपेठ उरली आहे. यामध्ये बाबीर यात्रा उत्सव महत्वाचा मानला जातो. या व्यवसायामध्ये हि मोजकिच कुटुंबे राहिली आहेत. राज्याच्या गारगोटी, शेणगाव, जिल्हा कोल्हापूर, अळसंदे, जिल्हा सांगली , मेटकरवाडी, चिखलठाण, केडगाव टाकळी, जिल्हा सोलापूर ,घोरपडवाडी, बोरी रुई जिल्हा पुणे या भागातून आलेल्या सुमारे १२० व्यावसायिकांनी यात्रा काळात घोंगडी व त्याचे उपप्रकार जाड घोंगडी, पांढरा पठ्ठा, जान आसन, शाली अशा सुमारे ७ हजार नगाची विक्री केली. पाचशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत लहान मोठ्या नगाची हि विक्री झाली. यामधून यात्रा बाजारात घोंगडी व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. यात्रे मध्ये सुमारे १२ हजार नग विक्रीस आले होते ८० टक्के विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
पंढरपूर, आळंदी, पैठण, पठाणकोडली, चिंचणी, म्हसा ठाणे, वीर, मस्कोबा, सालपे बिरोबा लोणंद या यात्रा बाजारपेठमध्ये व कोकण भागातील कणकवली फोंडा कुडाळ येथे हि भात रोपांसाठी मागणी असते. हा व्यवसाय हातमागावर चालणारा आहे मात्र यांत्रिकी युग असूनही चांगले दिवस आहेत- रामा जाडकर, व्यापारी चिखलठाण (सोलापूर)