दुर्दैवी घटना! १०८ नंबरची ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याने जन्मलेल्या बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:22 PM2023-05-24T17:22:08+5:302023-05-24T17:24:59+5:30
१०८ नंबरची ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याने खाजगी ॲम्बुलन्सद्वारे ससूनकडे धाव घेतली...
तळेगाव ढमढेरे (पुणे) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर व्हॅक्युम प्रसूतीनंतर बाळ जन्माला आले पण शासनाची १०८ नंबरची ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध न झाल्याने खाजगी ॲम्बुलन्सद्वारे ससून कडे धाव घेतली खरी... पण काळाने घाला घातला या बाळाचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण?
याबाबत तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल काकडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नेहा बळीराम माने (वय २२ वर्ष विठ्ठलवाडी-भोसे वस्ती) ही महिला प्रसूतीसाठी तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. २३ रोजी दाखल झाली. व्हॅक्युम प्रसूती करण्याशिवाय पर्याय नसल्याने यासाठी डॉ. शरद लांडगे व डॉ. चंद्रकांत केदारी यांना फोनद्वारे बोलावून घेण्यात आले. दुपारी २.४५ वा. व्हॅक्युम प्रसुती झाल्यानंतर बाळाचे वजन साधारण ३.३ किलोग्रॅम होते. परंतु बाळाचे हृदयाचे ठोके मात्र मिनिटाला फक्त ३० दरम्यान होते त्यामुळे निवोनेटल रिसस्किटेशन द्वारे हृदय सुरू करण्यात आले. असे डॉ. शरद लांडगे यांनी सांगितले.
जन्मापूर्वीच विष्टा तोंडात गेल्याने बाळ जन्मल्याबरोबर ते रडले नाही. परिस्थिती गंभीर होत चालल्याने शासनाच्या १०८ नंबरला तीन वेळा संपर्क करण्यात आला यावेळी ऑक्सिजन उपलब्ध असणारी ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले साधारण दीड तासानंतर ॲम्बुलन्स उपलब्ध होईल असे सांगण्यात आले. 23 रोजी ३.३० वा. खाजगी ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या ॲम्बुलन्सद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या बाळाला पुढील उपचारासाठी ससूनकडे पाठवण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका दिपाली ढगारे, रेखा बांडे व बाळाची आई नेहा माने यांनी ससून गाठले. येथील डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने बाळाच्या मातीने आक्रोश केला. परंतु नियती पुढे विलास नव्हता.
त्याच दिवशी बाळाची माता संध्याकाळी ७.३० वा. तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर या मातेचा ब्लड प्रेशर चेकअप केल्यानंतर तो नॉर्मल होता मात्र मूत्र विसर्जनात अडथळे येऊ लागल्याने या मातेलाही त्रास होऊ लागला. रात्री दहा वाजताच्या दरम्यान नळीद्वारे १ हजार मिली मूत्र विसर्जन झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दिनांक २४ रोजी सकाळी ७.४५ वा. पुढील उपचारासाठी या बाळाच्या मातेला शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. येथेही उपचार होऊ न शकल्याने पुढील उपचारासाठी या ग्रामीण रुग्णालयाने ससून रुग्णालयात या महिलेला पाठवले. यादरम्यान या प्रसूती झालेल्या महिलेचे फारच हाल झाले.
शिरूर तालुक्यात शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मोठ्या दिमाखात उभी केली. मात्र शिरूर तालुक्यात शासनाच्या माध्यमातून कोठेही अतिदक्षता विभागच उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य जनतेचे आरोग्याच्या सेवा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पुढील उपचार घेण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयाकडेच येथील रुग्णांना धाव घ्यावी लागत आहे. पुणे नगर रोडवरील ट्राफिक जाम मुळे या ॲम्बुलन्स पोहोचण्यास उशीर देखील होतो. यामध्ये शासनाच्या ऑक्सीजन उपलब्ध असणाऱ्या १०८ नंबरच्या ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नाहक बळी जात आहेत.
पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यासाठी १०८ नंबरला दहा ते पंधरा वेळा संपर्क करण्यात आला. यावेळी न्हावरा येथून यथावकाश दोन तासानंतर ॲम्बुलन्स आली व ससून रुग्णालयात या महिलेला हलवण्यात आले. दि.२४ रोजी १.५०वा.ससून मध्ये पोहोचल्यानंतर या महिलेवर पुढील उपचार सुरू झाले आहेत.
-महेंद्र गवारे (माजी उपसरपंच, विठ्ठलवाडी)