बेबी कालवा पाझरू लागल्याने ग्रामस्थांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:56 AM2018-09-26T01:56:10+5:302018-09-26T01:56:38+5:30
गावाच्या हद्दीतून जाणारा पुणे पाटबंधारे खात्यांतर्गत असलेला बेबी कालवा गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पाझरू लागल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे.
कुंजीरवाडी - गावाच्या हद्दीतून जाणारा पुणे पाटबंधारे खात्यांतर्गत असलेला बेबी कालवा गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा पाझरू लागल्याने स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही कर्तव्यदक्ष अधिकारी चालढकलपणा करून तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करत आहेत.
कालव्याला लागूनच लोकवस्ती व प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. या कालव्याचे मोठ्या स्वरूपात पाझरलेले पाणी शेजारील शाळेच्या आवारात व स्थानिकांच्या घरामध्ये घुसत आहे. अगोदरच डेंग्यू, ताप अशा आजारांच्या सावटामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहे. या पाण्यामुळे वाढत चाललेली दुर्गंधी व डास यामुळे विद्यार्थी व स्थानिक बेहाल झाले आहेत. या बेबी कॅनॉलचा भराव मजबूत नसल्याने तो केव्हाही फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते. अशी स्थानिक नागरिकांमध्ये सध्या चर्चा आहे. वेळोवेळी संबंधित अधिकारीवर्गाशी पाठपुरावा करून देखील या कामाची दखल कोणीही घेत नाही. मंगळवारी या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आठवडे बाजार भरत असतो. शेतकाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, या कालव्याच्या पाझरण्यामुळे बाजारात त्याची अडचण होत आहे.
आम्ही २०१६ पासून कार्यकारी अभियंता, खडकवासला, अधीक्षक अभियंता पाटबंधारे पुणे, उपविभागीय अभियंता मुठा कालवे स्वारगेट या सर्वांना ग्रामपंचायतीतर्फे कालव्याच्या पाझरण्याबाबत वेळोवेळी लेखी अर्ज केलेले आहेत. परंतु या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा मात्र निघत नाही.
- अनुराधा कुंजीर,
कुंजीरवाडी सरपंच
बेबी कालवा लायनिंगचा प्रस्ताव तयार केलेला असून, तो मान्य होताच काम सुरू करणार आहोत. तोपर्यंत कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथे ज्या ठिकाणी समस्या आहे ती तातडीने आम्ही दुरुस्त करणार आहोत.
- शेलार,
कार्यकारी अभियंता पाटबंधारे