बाळगोपाळांचे डोके मोबाइलमध्ये, मैदानांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:35+5:302021-03-07T04:11:35+5:30

पुणे : ऑनलाइन शिक्षणामुळे पालक आणि शाळांकडून मुलांच्या हातात देण्यात आलेल्या मोबाइल, टॅब, लॅपटॉपसारख्या साधनांमुळे मुलांचे स्वत:चेच आभासी विश्व ...

Babysitting heads in mobiles, back to the grounds | बाळगोपाळांचे डोके मोबाइलमध्ये, मैदानांकडे पाठ

बाळगोपाळांचे डोके मोबाइलमध्ये, मैदानांकडे पाठ

Next

पुणे : ऑनलाइन शिक्षणामुळे पालक आणि शाळांकडून मुलांच्या हातात देण्यात आलेल्या मोबाइल, टॅब, लॅपटॉपसारख्या साधनांमुळे मुलांचे स्वत:चेच आभासी विश्व घरातच तयार झाले आहे. ऑनलाइन शिक्षणाने मुलांचे शैक्षणिक वर्ष तारले असले तरी मुलांना ‘स्क्रीन टाइम’मध्ये गुंगवून टाकले आहे. त्यामुळे मैदानी खेळांपासून ही मुले दुरावली आहेत. मोबाइल व अन्य गॅझेटच्या व्यसनापायी मुले मोकळ्या हवेत खेळायला जाणेच विसरली आहेत.

जेमतेम वर्षभरापूर्वीच्या कोरोनापूर्व कालावधीत उद्याने, क्रीडांगणे किंवा सोसायट्यांमधल्या मोकळ्या जागांवर खेळणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय होती. या जागा आता बव्हंशी ओस पडल्याचे चित्र आहे. ‘स्क्रीन’च्या व्यसनापायी मुलांचा पाय घराबाहेर निघत नाही आणि जरी खेळायला घराबाहेर गेली तरी तिथे ती फार रमत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून ऐकायला मिळत आहेत.

ज्येष्ठ नागरिक मधुकर पवार यांनी सांगितले की, आमच्यावेळी विटीदांडू, धपाधपी, झोपाळे, पोहणे, धावणे, आट्यापाट्या या सारखे घराबाहेरचे खेळ होते. यातून व्यायाम व्हायचा. हे खेळ ग्रामीण आणि शहरी भागात खेळले जायचे. पण त्यांना क्रिकेट, हॉकीसारखी प्रतिष्ठा मिळाली नाही. या खेळांचे पुनरूज्जीवन झाले नाही. त्यामुळे यातील निम्मे खेळ मागे पडले.

चौकट

मुलांमध्ये चिडचिड

“मुलांना आता मोबाइलवर गेम्स खेळण्याची सवय लागली आहे. पूर्वी किमान सोसाायटीत तरी खेळायला जायची, आता ‘अरे बाहेर खेळायला जा जरा,’ असे सांगावे लागत आहे. मुलांच्या हातातून मोबाइल काढून घेतला तर ती चिडचिड करायला लागतात.”

-अमृता देशपांडे, पालक

---------------------------------------------

आनंदाने खेळतात

“आमची मुले ऑनलाइन शिक्षणावेळी मोबाइल हातात घेतात. ऑनलाइन अभ्यास करून मैदानी खेळ खेळायला जातात. मुलांच्या हातात सातत्याने मोबाइल आहेत अशी स्थिती नाही. उलट शाळेचे टेंशन नसल्याने मुले आनंदाने खेळत आहेत.”

- रवींद्र धोंडोबा जाधव, पालक

----------------------------------------------

‘स्क्रीन टाइम’चे हवे नियोजन

“सुरुवातीपासूनच मुलांना मोबाइलचे व्यसन आहे. ज्या मुलांमध्ये मानसिक समस्या आहेत त्यांच्यामध्ये बदल अधिक प्रकर्षाने जाणवतात. मुलांमध्ये चिडचिडपणा वाढतो. इंडियन सायक्रॅटिक सोसायटीच्या नियमावलीनुसार दोन वर्षांच्या आतील मुलांना ‘स्क्रीन टाइम’ची परवानगीच नाही. दोन ते पाच वयोगटात मुलांना पालकांच्या सल्ल्यानुसार मोबाइलसारख्या गोष्टी हाताळण्यास द्याव्यात. पाच ते अठरा वयोगटातल्या मुलांनी ‘स्क्रीन टाइम’चे नियोजन करायला हवे.”

- डॉ. सीमा दरोडे, क्लिनिकल अँड स्कूल सायकॉलॉजिस्ट

-----------------------------------------------

चौकट

ऑनलाइन गेम्सची आवड

“मोबाइलवर गेम्स खेळायला अधिक आवडतात कारण त्याला वेळेची मर्यादा नसते. बाहेर खेळायला गेले तर सगळे मित्र भेटतातच असे नाही. त्यातच नऊच्या आत घरी येण्याची आईबाबांकडून सक्ती असते. त्यामुळे ऑनलाइन गेम्स खेळणे जास्त आवडते.”

-कबीर होमकर, विद्यार्थी इयत्ता तिसरी

-------------------------------------------

चष्म्याचा नंबर वाढता

“ज्या मुलांना चष्मा असतो, त्यांची कोणत्याही गोष्टी जवळून बघण्यात वाढ झाली तर त्यांच्या चष्म्याचा नंबरही वाढत जातो. स्क्रीनकडे एकटक बघितल्याने डोळ्यांचा कॉर्निया कोरडा होण्याची शक्यता आहे. डोळे लाल होणे, चुरचुरणे अशा तक्रारी दिसतात. प्रत्येक २० मिनिटांनी मुलांनी २० सेकंद लांब बघावे म्हणजे डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो.”

- डॉ. जाई केळकर, नेत्रतज्ज्ञ

Web Title: Babysitting heads in mobiles, back to the grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.