बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 04:05 PM2024-08-10T16:05:05+5:302024-08-10T17:14:12+5:30

भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे हेदेखील आज पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  

Bachu Kadu and bjp sanjay kakde met ncp Sharad Pawar set back for Grand Alliance | बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

Pune Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जातात. विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही विविध घटकांना सोबत घेण्याचा पवार यांचा प्रयत्न असून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली आहे. तसंच भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे हेदेखील आज पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  

महायुतीत असलेल्या बच्चू कडू यांचा सूर लोकसभा निवडणुकीपासूनच बदलल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे कडू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत नंतर या मतदारसंघात आपला स्वतंत्र उमेदवारही दिला होता. तसंच विधानसभा निवडणूक महायुतीतून लढायची की नाही, याबाबतचा निर्णय योग्य वेळी जाहीर करू, असं त्यांनी सांगितलं होतं. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चांचंही आयोजन केलं जात आहे. अशातच आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने आगामी काळात ते महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात, अशा चर्चांनी जोर धरला आहे.

पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले बच्चू कडू?

शरद पवार यांची भेट कोणत्या कारणास्तव घेतली, याबाबत बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "सध्या फक्त आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांचे प्रश्न अजेंड्यावर यावेत, असा माझा प्रयत्न आहेत. या प्रश्नांवरून लोकचळवळ व्हावी, यासाठी मी विविध नेत्यांना भेटत आहेत. आमचे एकूण १७ मुद्दे असून मी पवारसाहेबांशी आज त्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे," अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

दुसरीकडे, भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनीही पवार यांच्या भेटीनंतर खुलासा केला असून ही राजकीय भेट नसल्याचा दावा केला आहे. माझ्या मित्राच्या वैयक्तिक कामासाठी मी पवार यांची भेट घेतल्याचं काकडे यांनी सांगितलं आहे.

Web Title: Bachu Kadu and bjp sanjay kakde met ncp Sharad Pawar set back for Grand Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.