बटाटा वाण खरेदीकडे पाठ, पाण्याअभावी लागवडीचे क्षेत्र घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:58 AM2018-10-05T00:58:16+5:302018-10-05T00:58:20+5:30
तीन महिन्यांत १२९ ट्रक वाणांची आवक : पाण्याअभावी लागवडीचे क्षेत्र घटणार
मंचर : वाढलेला भांडवली खर्च; तसेच पावसाचे कमी प्रमाण यामुळे रब्बी हंगामातील बटाटा वाणाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी ग्राहकांची व्यापाऱ्यांना अक्षरश: वाट पाहावी लागत आहे. तीन महिन्यांत केवळ १२९ ट्रक बटाटा वाणाची पंजाब राज्यातून आवक झाली आहे; मात्र ग्राहकांअभावी बराचसा बटाटा वाण बाजार समितीत विक्रीअभावी पडून आहे. येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही, तर लागवडीच्या क्षेत्रात घट होणार आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बटाटा वाण विक्रीसाठी उपलब्ध असतो. राज्यातील ही बटाट्याची एकमेव महत्त्वाची बाजारपेठ आहे. मागील ३ वर्षांपासून बटाटा लागवड कमी होऊ लागली आहे, अशी माहिती व्यापारी संजय मोरे यांनी दिली. त्याचे कारण सांगताना मोरे म्हणाले की,पूर्वी राज्यभरामधील शेतकरी विशेषत: नगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सातारा, जालना आदी जिल्ह्यांतील शेतकरी प्रामुख्याने बटाटा वाण खरेदी करून त्याची लागवड करत होते. यावर्षी अपेक्षित पाऊस पडलेला नाही. पाऊस कमी पडल्याने त्या भागातील लागवड क्षेत्र घटले आहे. सध्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांतील शेतकरी बटाटा वाण खरेदी करुन लागवड करत असल्याची माहिती व्यापारी बाळासाहेब थोरात यांनी दिली.
बटाटा लागवडीचा भांडवली खर्च आता वाढू लागला आहे. इतर कुठल्याच पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकºयांकडे बटाटा पिकापुरतेही भांडवल शिल्लक नाही. त्याचा फटका शेतकºयांना बसला आहे. व्यापारी शिवाजी निघोट म्हणाले, की बाजार समितीत पंजाब राज्यातून बटाटा विक्रीसाठी येतो. गोळी, दोन खापी, मध्यम असा बटाटा विक्रीसाठी उपलब्ध असून, कमी भांडवल लागत असल्याने गोळी बियाण्याला जास्त मागणी आहे. सध्या शेतकरी वर्षभर शेतात लागोपाठ पिके घेत असल्याने जमिनीचा अतिवापर झाला आहे. पाण्याच्या जास्त वापराने त्याचा परिणाम गळीतावर होऊन उत्पादन घटले आहे, जमिनीचा कस कमी झाला आहे. पोत बिघडल्याने अपेक्षित उत्पादन निघत नाही. शिवाय, रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे लागवड क्षेत्र कमी झाले आहे.
सध्या बाजार समितीत १२९ ट्रक बटाटा वाणाची आवक झाली आहे. मागील वर्षी याचवेळी २१० ट्रक आवक झाली होती. यावर्षीचा खरीप हंगामसुद्धा वाया गेला आहे. केवळ १८२ ट्रक बटाटा वाणाची विक्री झाली. सध्या खाण्याचा बटाटा १५ ते १७ रुपये किलो या भावाने विकला जातो, तर लागवडीचा बटाटा १८०० ते २४०० रुपये क्विंटल अशा भावाने विकला जात आहे. मागील वर्षी हाच भाव सरासरी १५० ते १००० रुपये क्विंटल होता. बटाटा बियाण्याचे वाढलेले बाजारभाव हे सुद्धा लागवड कमी होण्याचे कारण आहेत. या हंगामात ३०० ट्रक बटाटा वाणाची विक्री होईल, असा व्यापाºयांचा अंदाज आहे.
आंबेगाव तालुक्यात पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. डिंभे धरण भरलेले असून, कालव्याच्या पाण्यामुळे विहिरीची पाणीपातळी वाढली आहे.तालुक्यातील १३0 एकर क्षेत्रात रब्बी हंगामातील बटाटा लागवड झाली आह. पाणी उपलब्ध असलेल्या भागात ही लागवड झाली आहे. मात्र, इतर जिल्ह्यात बटाटा लागवड कमी झाली आहे. परिणामी, मंचर बाजार समितीमध्ये बटाटा वाण शिल्लक राहिला आहे.
- एस. एस. विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी
परतीच्या पावसाकडे शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत. ८ दिवसांत पाऊस पडला, तर शेतकरी बटाटा लागवड करण्याचे धाडस करतील; अन्यथा लागवड क्षेत्र कमी होऊन बाजार समितीत उपलब्ध असलेला बटाटा विक्रीअभावी शिल्लक राहण्याची शक्यता विक्रेते के. के. थोरात यांनी व्यक्त केली आहे. बटाटा लागवड क्षेत्र देशभरातच कमी झाले आहे. दक्षिण भारतात लागवड कमी झाली आहे, तर बंगाल व इंदौर भागात लागवड उशिरा होणार आहे. खाण्यासाठी लागणाºया बटाट्याचा तुटवडा भासणार आहे. त्याचा स्टॉक कमी असल्याने भविष्यात बटाट्याचे बाजारभाव अजून कडाडणार आहे.