मतदानासह, मतदार यादीतही शहर मागे; यादीसाठी छायाचित्र देण्यात उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:42 AM2018-07-28T02:42:56+5:302018-07-28T02:43:19+5:30

मतदार यादीतूनही ग्रामीण भागातील मतदारांची राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे

Back to town in voter list, including voting; Indifference to the photo for the list | मतदानासह, मतदार यादीतही शहर मागे; यादीसाठी छायाचित्र देण्यात उदासीनता

मतदानासह, मतदार यादीतही शहर मागे; यादीसाठी छायाचित्र देण्यात उदासीनता

Next

- विशाल शिर्के 

पुणे : शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदानाची सरासरी अधिक असल्याचा अनुभव प्रत्येक निवडणुकीत येतो. मतदार यादीतूनही ग्रामीण भागातील मतदारांची राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या जिल्ह्यातील सव्वाचार लाख मतदारांपैकी शहरातील पावणेचार लाख मतदारांनी यादीसाठी छायाचित्रच उपलब्ध करून दिलेले नाही. जिल्ह्यात पर्वती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३९ हजार ५४९ मतदारांचे छायाचित्र कृष्णधवल (ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट) आहे. शहर मध्यवस्तीतील या भागाने ग्रामीण भागालाही मागे टाकले आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील ७२ लाख २३ हजार ४२९ मतदारांपैकी तब्बल ४ लाख ३५ हजार ४१३ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही.
तसेच, मतदारयादीत कृष्णधवल फोटो असणाऱ्या मतदारांचे प्रमाणदेखील दोन लाखांच्या घरात आहे. मतदार यादी अद्ययावत करताना या मतदारांचे छायाचित्र घेण्याचे आव्हान निवडणूक कार्यालयासमोर आहे. विशेषत: शहरी भागात घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयामार्फत (बीएलओ) मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतरही अनेक नागरिकांनी छायाचित्रे उपलब्ध करून दिली नाहीत.
जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात मिळून २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील ८ विधानसभा मतदारसंघ पुणे, ३ पिंपरी-चिंचवड आणि १० मतदारसंघ ग्रामीण भागात आहेत. य्
ाा सर्व मतदारसंघात मतदार यादीत छायाचित्र नसलेले तब्बल ४ लाख ३५ हजार ४१३ मतदार आहेत. मतदार यादीत छायाचित्रच नसलेले मतदार ग्रामीण भागात अवघे ५० हजार ४७ इतके आहे. शहरात हीच संख्या तब्बल ३ लाख ४८ हजार ३६२ इतकी भरते.
शहरात १ लाख ९७ हजार ५२८ मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र मतदार यादीत आहे. त्यातील १ लाख १८ हजार २७० ग्रामीण, तर ७९ हजार २५९ शहरी मतदारसंघांतील आहेत. त्यातही जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूरमधे कृष्णधवल छायाचित्रांचे प्रमाण अधिक आहे.
आश्चर्यकारकरीत्या शहर मध्यवस्तीतील पर्वती विधानसभा मतदारसंघात कृष्णधवल छायाचित्र असलेल्यांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. फोटो नसलेल्यांच्या यादीतही वडगावशेरी मतदारसंघाचा क्रमांक जिल्ह्यात अव्वल असून, तेथील ७४ हजार ४३७ मतदारांची छायाचित्रे यादीत नाहीत.

भोर-बारामतीचे मतदार जागरूक; हडपसर, खडकवासला मागे

भोर आणि बारामती विधानसभा मतदारसंघांत छायाचित्र नसलेले अथवा कृष्णधवल छायाचित्र नसलेल्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.
बारामतीत ४११ मतदारांचे यादीत फोटो नसून, २,६०१ मतदारांचे छायाचित्र कृष्णधवल आहे. भोरमधे कवळ १०१ मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र असून ३, १९३ मतदारांचे यादीत छायाचित्र नाही.
वडगावशेरीतील ७४ हजार ४३७, हडपसरमधील ५४, ७७५ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ५३,७८४ मतदारांचे छायाचित्र यादीत नाहीत.

मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, छायाचित्र नसलेल्या अथवा कृष्णधवल छायाचित्र असलेल्या मतदारांकडून रंगीत फोटो घेण्यात येत आहेत. विशेष मतदार मोहिमेत अथवा घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नागरिकांनी यादीसाठी छायाचित्रे उपलब्ध करून द्यावीत. अशी छायाचित्रे नसल्यास यादीतून नाव वगळण्यात येणार नाही; मात्र यादी अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
- मोनिका सिंह,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title: Back to town in voter list, including voting; Indifference to the photo for the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.