‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर असणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:18+5:302021-09-25T04:11:18+5:30
२ ऑक्टोबरला ग्रामसभा ऑफलाईन घेण्यास परवानगी बारामती : गावकारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसभा घेण्याचा मार्ग आता मोकळा ...
२ ऑक्टोबरला ग्रामसभा ऑफलाईन घेण्यास परवानगी
बारामती : गावकारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामसभा घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असणारे निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार येत्या २ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन / ऑफलाईन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाचे अवर सचिव सुहास जाधवर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने यासाठी मान्यता दिली आहे. मात्र, ग्रामसभा घेताना राज्य शासनाच्या कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच ऑफलाईन किंवा ऑनलाईन ग्रामसभा घेता येणार आहेत. ग्रामसभा घेताना प्रत्येक ग्रामसभेने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सचे पालन, सॅनिटायझरचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
ग्रामपंचायतीत गावाच्या संबंधित विविध महत्त्वाचे निर्णय होतात. ग्रामविकास ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयावर होतो. त्यासाठी ग्रामसभेत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांची मोलाची चर्चा होते. मात्र, कोरोनामुळे ऑनलाईन सभा पार पडत होत्या. आता प्रत्यक्षात ग्रामसभेत सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.
ग्रामविकास विभागाचे अवर सचिव जाधवर यांनी राज्यातील जिल्हा परिषदा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्राद्वारे सूचना, आदेश दिले आहेत. दरवर्षी दि. २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम ७ अन्वये ग्रामसभा आयोजित केली जाते. तथापि, कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रादुर्भावास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्याचे जाधवर यांनी आदेशात नमूद केले आहे.