केंद्राचा निधीच उपलब्ध न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 09:56 PM2018-03-22T21:56:53+5:302018-03-22T21:56:53+5:30
एफटीआयआय ही शासकीय संस्था असल्याने काही प्रवेश एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
पुणे : केंद्र शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्यामुळे फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ( एफटीआयआय) मधील तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.
केंद्राकडून निधी मिळाल्यामुळे यंदाच्या वर्षात ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे विद्यार्थ्याँनी दुस-या वर्षीच्या शिष्यवृतीचे नूतनीकरणच केले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे.
एफटीआयआय ही शासकीय संस्था असल्याने काही प्रवेश एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर आॅनलाईन माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करतात. त्यातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर केंद्राकडून संस्थेला निधी देण्यात येतो. त्यानुसार त्याची रक्कम विद्यार्थ्यां खात्यात जमा केली जाते. मात्र २०१६-१७ मध्ये दिग्दर्शन, अभिनय यांसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना अद्यापही त्या शैक्षणिक वर्षाची रक्कम मिळाली नसल्याचे समोर आले आहे. या शिष्यवृत्तीची रक्कम ही ८५ हजार ते १ लाख रूपयांपर्यंत असल्याने विद्यार्थ्यांनी संस्थेतील शैक्षणिक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच खात्यात जमा होईल असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षामधील रक्कम किमान २०१७ च्या जून-जुलै मध्ये तरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, २०१८ उजाडले तरी ती रक्कम मिळालेली नाही. पहिल्याच वर्षीची रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने दुस-या वर्षीच्या शिष्यवृत्तीचे आम्ही नूतनीकरणच केले नाही. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्याचे विद्यार्थ्यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले.
यासंदर्भात एफटीआयआयच्या शैक्षणिक विभागातील संबंधित अधिका-याशी संपर्क साधला असता त्यांनी केंद्राकडून निधीच उपलब्ध न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्याँना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास विलंब लागला असल्याची कबुली दिली. दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण हे जून-जुलै मध्ये करावे लागते विद्यार्थ्यांनी ते केले नसेल तर ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.