टोमॅटो पिकावर विषाणूंचा हल्ला
By admin | Published: June 15, 2016 04:47 AM2016-06-15T04:47:22+5:302016-06-15T04:47:22+5:30
वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला
मंचर : वातावरणातील बदलामुळे आंबेगाव तालुक्यात टोमॅटो पिकावर विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगांनी हल्ला केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ बहुतेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून, महागड्या औषधांची फवारणी करून कोणताही फायदा होत नाही़ शेतकऱ्यांच्या अंगावर भांडवल आले आहे.
नगदी उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोने मागील दोन वर्षे शेतकऱ्यांना मालामाल केले़ यावर्षी मात्र टोमॅटोउत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सुरुवातीस बियाण्यात फसवणूक होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या टोमॅटोबागा अक्षरश: उपटून टाकाव्या लागल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुसरे टोमॅटो पीक घेतले, मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही.़ टोमॅटोची लागवड झाली की लगेच रोपांची मर सुरू होते़ तसेच निम्मे पीक वाया जाते़
पिकाची वाढ होताना व्हायरस अॅटॅक वाढला आहे़ पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़ विषाणूजन्य रोगामुळे टोमॅटोची पाने बारीक होतात़ वाढ खुंटते त्यामुळे टोमॅटो फळ बारीक निघते. अद्याप पाऊस पडला नाही. वातावरणात उष्णता आहे़ यामुळे किडीला व रोगाला पोषक असे वातावरण निर्माण होत आहे़
तालुक्यात सध्या ७ हजार एकर क्षेत्रावर टोमॅटो पीक घेतले जात असल्याचा अंदाज आहे़ बहुतेक ठिकाणाच्या टोमॅटो पिकावर याचा परिणाम जाणवत आहे. शेतकरी पीक वाचविण्याचा व जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे़ मात्र, त्याला यश येताना दिसत नाही़ (वार्ताहर)
- टोमॅटोला एकरी ४० ते ५० हजार रूपये खर्च येतो़ रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात अजून वाढ झाली आहे़ विशेषत: विषाणूजन्य व्हायरसला अटकाव करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहे़
औषध फवारणी करूनसुद्धा कुठलाही परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झालेले दिसतात़ टोमॅटो पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे़ पाऊ स पडला तर मात्र परिस्थिती बदलू शकते़ टोमॅटोवरील व्हायरस अटॅक बऱ्यापैकी नियंत्रणात येईल, असे महेश मोरे यांनी सांगितले़