राजगुरुनगर शहरातील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 01:23 PM2019-05-18T13:23:18+5:302019-05-18T13:27:45+5:30
हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पासाठी सुशोभीकरणासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करून त्याची अवस्था बकाल झाली आहे.
राजगुरुनगर (दावडी) : राजगुरुनगर येथील बस स्थानकासमोर उभारण्यात हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पासाठी सुशोभीकरणासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करून त्याची अवस्था बकाल झाली आहे. याची देखभाल नक्की कोणी करायची, हा प्रश्न राजगुरुनगरवासियांना पडला असल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे-नाशिक महामार्गालगत राजगुरुनगर बस स्थानकासमोर पन्नास लाख रुपयांच्या प्रशासकीय कामांना मंजुरी देण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर सदरील कंत्राटदाराने काम हाती घेतले. ते पूर्णही केले. मात्र याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पडला होता. आठ महिन्यांपूर्वी हुतात्म्यांची शिल्पे उभारण्यात आली. तसेच चारही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात आली.
हुतात्म्यांच्या शिल्पाभोवती बागबगीचा तयार करून शोभिवंत फुलांची झाडे, लॉन लावणे, गार्डन विकसित करणे पाथवे तयार करणे आदी कामे करण्यात आली होती. मोठ्या थाटामाटात या हुतात्म्यांच्या शिल्पांचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. दरम्यान, तात्पुरती जबाबदारी राजगुरुनगर आगाराने घेतली होती. मात्र, या हुतात्म्यांचे पुतळे व या परिसरात विद्युतरोषणाई करण्यासाठी वीज कनेक्शन बस स्थानक आगाराने दिले होते. मात्र, याचे वीजबिल कोण भरणार, या कारणास्तव राजगुरुनगर बस स्थानकाने वीज कनेक्शन बंद केले होते. त्यामुळे पुतळे काही दिवस अंधारात होते. हे गार्डन चांगले विकसित होईल, असे वाटले होते. तसेच, काही दिवस खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी स्वत: लांडेवाडी येथून भैरवनाथ पतसंस्थेमार्फत एक टँकर या गार्डनमध्ये लावलेल्या लॉन व झाडांना पाणी देण्यास सुरू केला होता. तसेच, दरम्यान तिथे एक बोरवेल खोदून विद्युत पंप बसवून झाडांना पाणी देण्यात येत होते. पेव्हर ब्लॉक, विविध जातींची झाडे यामुळे हुतात्म्यांच्या शिल्पाभोवती गार्डनच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे वाटत असतानाच सद्य:स्थितीला मात्र या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे.
........
या हुतात्म्यांचे पुतळे व गार्डन यांची देखभाल करण्यासाठी राजगुरुनगर परिषद तयार आहे. यासाठी नगरपरिषेदने एसटी महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रीतसर परवानगी मागून पत्र व्यवहार केला; मात्र अद्यापही अधिकृतरीत्या आम्हाला परवानगी दिली नाही.- शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरुनगर नगर परिषद
...........
एसटी महामंडळ पुणे विभागाने आम्हाला पुतळा देखभाल-दुरुस्ती गार्डनमधील फुलझाडांना पाणी देणे तसेच साफसफाई करणे याबाबत राजगुरुनगर डेपोला कळविले नाही. आम्हाला परवानगी दिली तर राजगुरुनगर डेपोतून हुताम्यांच्या पुतळ्याची जवाबदारी घेऊ.- आर. जी. हांडे, आगारप्रमुख, राजगुरुनगर बस स्थानक
.......
लॉन व झाडे जगविण्यासाठी व पुतळे पाण्याने स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी एक बोअर घेतला आहे. मात्र, येथे एक कर्मचारी होता. तो झाडांना पाणी देणे, साफसफाई करणे, त्यामुळे झाडे, शोभिवंत फुलांच्या झाडांनी चांगला जोम धरला होता. मात्र, तो सध्या इथे दिसत नाही. महिनाभरापासून हा कर्मचारी गायब आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गार्डनमधील सर्वच झाडे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. या गार्डनला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी नगरपरिषद व राजगुरुनगर आगाराने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
............