महत्त्वाची बातमी! खराब खाद्यपदार्थ, हॉटेल, स्वीट होम्सची तक्रार दाखल करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 01:37 PM2021-10-02T13:37:39+5:302021-10-02T13:41:45+5:30

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे

bad food hotels sweet homes can be reported fssai | महत्त्वाची बातमी! खराब खाद्यपदार्थ, हॉटेल, स्वीट होम्सची तक्रार दाखल करता येणार

महत्त्वाची बातमी! खराब खाद्यपदार्थ, हॉटेल, स्वीट होम्सची तक्रार दाखल करता येणार

Next

बारामती: अनेकदा तुम्ही हॉटेलमध्ये जाता मात्र, तेथे भरभक्कम पैसे देऊनही चांगलं जेवण मिळत नाही. त्यामुळे पैसे तर जातातच, पण जेवणही खराब दिलं जातं. मात्र, आता असं करण हॉटेल्सला महागात पडू शकणार आहे. १ ऑक्टोबर, २०२१ पासून खराब खाद्यपदार्थ देणाऱ्या हॉटेल, केटरर्स, स्वीट होम्स, बेकरी यांची तात्काळ तक्रार दाखल करण्याचे अधिकार ग्राहकांना देण्यात आले आहे. अन्न सुरक्षा विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. याबाबत राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अ‍ॅड. तुषार झेंडे यांनी माहिती दिली. त्यानुसार फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (fssai) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी १ ऑक्टोबरपासून एक नवा नियम लागू केला आहे. आजपासूनच त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (Food Safety and Standards Authority of India) फूड बिजनेस ऑपरेटर्ससाठी लागू केलेल्या नियमानुसार बिलामध्ये ‘एफएसएसएआय’ लायसन्स नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकणं अनिवार्य केल आहे. याबाबत ‘एफएसएसएआय ’ने एक आदेश जारी केला आहे. यामुळे आता जेवणाच्या गुणवत्तेबाबत, इतर तक्रारींविषयी ग्राहकांना तक्रार करणं सोपं होणार आहे. यापुढे ग्राहक ‘एफएसएसएआय’ नंबरचा उपयोग करुन संबंधित हॉटेलविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात.

अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक फुड बिजनेस ऑपरेटरला आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘एफएसएसएआय’ किंवा नोंदणी मिळवणं आवश्यक आहे. खाद्यपदार्थ उद्योग मोठा आहे. या व्यवसायांचा ‘एफएसएसएआय’क्रमांक ग्राहकांना सहजासहजी दिसत नाही. कोणतीही विश्वासार्ह नियंत्रण व्यवस्था ही त्यामधील ग्राहकांच्या मजबूत ग्राहक तक्रार प्रणालीवर अवलंबून आहे. जर संबंधित हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडे एफएसएसएआय नंबर नसल्यास, त्यांच्या विरोधात तक्रार करणं कठिण काम होऊन जातं.

दरम्यान, खाद्यपदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्या नियमांच्या प्रचारासाठी निर्देश जनजागृती आणि प्रबोधन करण्याचंही नियोजन केल आहे. यासाठी त्यांनी परवाना आणि नोंदणी अधिकाऱ्यांना नव्या नियमांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे नियम २ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होतील. पॅकेजिंग केलेल्या अन्नपदार्थांवर ‘एफएसएसएआय नंबर छापणं बंधनकारक करण्यात आल आहे. यात रेस्टॉरंट्स, मिठाईची दुकानं, केटरर्स आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांचाही समावेश आहे. यांनाही आपल्या खाद्य पदार्थांवर हा नंबर नमूद करावा लागणार आहे.

... ‘एफएसएसएआय’ नंबरचं ग्राहकांसाठी महत्त्व- 
 ‘एफएसएसएआय’ क्रमांक हा कोणत्याही खाद्यपदार्थ उत्पादकाचा खास १४ अंकी क्रमांक असतो. ‘एफएसएसएआय’ क्रमांक संबंधित उत्पादकाच्या खाद्यपदार्थ पॅकिंगवर नमूद असल्यास त्यांच्या विरोधात सहज तक्रार करता येते. मात्र, जर तो क्रमांक नसल्यास संबंधित पदार्थ कुणाचे आहेत, याची ओळख पटवणं कठीण होतं. म्हणूनच फूड बिजनेस ऑपरेटरची तक्रार करण्यासाठी हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यातून दोषींवर तात्काळ कारवाई करता येणार असल्याचे अ‍ॅड झेंडे यांनी सांगितले.

Web Title: bad food hotels sweet homes can be reported fssai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.