शाळा, महाविदयालयांची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शाळांमध्ये विद्यार्थिनी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:56 AM2022-03-25T08:56:44+5:302022-03-25T08:59:07+5:30

पालकांनीच शाळा व्यवस्थापनाला जागे करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारायला हवा...

bad security of schools colleges cctv cameras off schoolgirls unsafe in city | शाळा, महाविदयालयांची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शाळांमध्ये विद्यार्थिनी असुरक्षित

शाळा, महाविदयालयांची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद, शाळांमध्ये विद्यार्थिनी असुरक्षित

Next

पुणे : दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्या आहेत. पण तेथील अनेक सोयी-सुविधा बंद आहेत. त्या सुरू होणे आवश्यक आहे. शाळांमधील सीसीटीव्ही बंद पडले असून, त्यामुळे शाळेत कोण ये-जा करतो, ते समजत नाही. परिणामी अनुचित प्रकार घडू शकतात. नुकताच एका शाळेत तसा प्रकार घडला आहे. त्यामुळे शाळांनी पुन्हा आपल्या सर्व सोयीसुविधा सुरू कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जर सीसीटीव्ही बंद असतील, तर मुली असुरक्षित होणार आहेत.

शहरात कब्बडी खेळाडू मुलीचा झालेला खून, दहावीतील मुलीवर केलेला प्राणघातक हल्ला या घटना ताज्या आहेत. त्यातच शहरातील मध्यवर्ती भागातील शाळेतील मुलीवर शाळेच्या आवारात येऊन एका अनोळखी व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली. परिणामी शाळा-महाविद्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालकांनीच शाळा व्यवस्थापनाला जागे करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारायला हवा.

शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. आपली मुले सुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत,याची पालकांना खात्री वाटायला हवी. त्यामुळे सर्व शिक्षण संस्थांनी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालक शिक्षक संघ,माता पालक संघ, परिवहन समिती, सुरक्षा विषयक समिती स्थापन करून त्या कार्यन्वित करायला हव्यात. मात्र,बहुतांश शाळांमध्ये एकही समिती नसल्याचे दिसले.

ओरडतील म्हणून गप्प बसू नका

अत्याचाराच्या दररोज ऐकायला मिळणाऱ्या घटना धडकी भरवतात. मुलींच्या पालकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. मात्र, पालकांनी घाबरून न जाता अथवा मुलींवर अनावश्यक बंधने न लादता त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज असते. बरेचदा पालक आपल्यालाच ओरडतील, या भीतीने मुली घरी कोणतीच गोष्ट सांगत नाहीत. ही ‘कम्युनिकेशन गॅप’ भरून निघायला हवी. मला दोन मुली आहेत. एक नववीत, तर दुसरी सहावीत शिकत आहे. लहानपणापासून आम्ही दोघांनी त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते ठेवले आहे. काहीही घडले तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण झाल्यास ती आपल्याशी खुलेपणाने बोलू शकतात. मुलांना लैैंगिक शिक्षण देण्याची सुरुवातही घरापासूनच व्हायला हवी.

- निकिता लिमये, पालक

कोरोनामुळे शाळास्तरावरील अनेक गोष्टी कार्यान्वित झाल्या नाहीत. गवत वाढल्याने व कचरा साचल्याने काही शाळा अस्वच्छ आहेत. ग्रंथालय व प्रयोगशाळांची दुरवस्था झाली असून, काही स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी लवकर सर्व गोष्टी नीटनेटक्या कराव्यात. त्याचप्रमाणे पीटीए, माता पालक संघ, परिवहन समित्यांची स्थापना करावी.

- औदुंबर उकिरडे,शिक्षण उपसंचालक,पुणे विभाग

पुण्यातील एका नामांकित शाळेत मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. त्यावेळी शाळेची सुरक्षा यंत्रणा काय करीत होती? या अत्याचारी कृत्याचा आणि मुलांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणाऱ्या शाळा प्रशासनाचा तीव्र निषेध. शाळेत सातत्याने घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- दिलीप सिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापेरेंट्स

शाळेच्या आवारात अनोळखी व्यक्ती आल्यास संबंधित व्यक्तीला थांबवणे, वर्गात जाण्यापासून रोखणे ही शाळेतील कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मुख्याध्यापकांच्या बैठकीमध्ये चर्चा करून अधिक जनजागृती करू.

- महेंद्र गणपुले,प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

प्रत्येक शाळेमध्ये बाल संरक्षक समिती असावी आणि त्या माध्यमातून जाणीव जागृतीचे कार्यक्रम व्हावेत, अशा शासनाच्या सूचना आहेत. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत विशेष न्यायालयात महिला मॅजिस्ट्रेटसमोर इन कॅमेरा पीडितेचा जबाब नोंदवून घेतला जातो. अशा घटनांमध्ये आरोपीला स्वत:ची बाजू सिद्ध करावी लागते. यामध्ये वकिलांनी पीडितेची उलटतपासणी घेऊ नये, याबाबत जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे.

- नंदिता अंबिके, मुस्कान संस्था

Web Title: bad security of schools colleges cctv cameras off schoolgirls unsafe in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.