उद्यान-वृक्ष प्राधिकरणामध्ये बेदिलीच; महिनाभरात लावायची ६० हजार झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:15 AM2018-07-06T04:15:02+5:302018-07-06T04:15:09+5:30
दोन स्वतंत्र विभाग केल्यानंतरही महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीमधील बेदिली थांबायला तयार नाही. वृक्षारोपणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित एका बैठकीतून प्राधिकरणाचे अधिकारी मध्येच उठून गेले असल्याची चर्चा महापालिकेत आहे.
पुणे : दोन स्वतंत्र विभाग केल्यानंतरही महापालिकेच्या उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीमधील बेदिली थांबायला तयार नाही. वृक्षारोपणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित एका बैठकीतून प्राधिकरणाचे अधिकारी मध्येच उठून गेले असल्याची चर्चा महापालिकेत आहे. परस्परांचे फोन घेण्यावरून त्यांच्यात वाद होऊन आमचा अपमान झाला, असे सांगून बैठकच सोडण्यात आल्याचे समजते.
राज्य सरकारने १ ते ३१ जुलैदरम्यान ६० हजार झाडे लावण्याचे बंधन महापालिकेला घातले आहे. त्यासाठी एकत्रित काम करण्याऐवजी श्रेय कोणाला, यावरून समिती व उद्यान यांच्यात खंडाजंगी सुरू आहे. उद्यान विभागाच्या अखत्यारीतच यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समिती होती. मुख्य उद्यान अधीक्षक समितीचे सदस्य सचिव असत. आयुक्त पदसिद्ध अध्यक्ष व १३ सदस्यांमध्ये ६ नगरसेवक व ७ अशासकीय सदस्य, अशी समितीची रचना आहे. शहरातील वृक्षांच्या फांद्या तोडणे किंवा वृक्षच काढून टाकणे यासाठी आलेल्या अर्जांवर निर्णय घेणे, हे समितीचे मुख्य काम असून त्याशिवाय वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण अशीही कामे समितीकडे सोपविण्यात आली आहेत.
वृक्षारोपणाची जबाबदारी मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांच्यावर आहे. नियोजनासाठी घोरपडे यांनी बोलावलेल्या बैठकीत दोन अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. कामासाठी फोन केल्यानंतर फोनच घेतला जात नाही, त्यानंतर परत फोनही केला जात नाही, अशी
तक्रार अधिकाºयांनी समितीच्या अधिकाºयांबाबत केली. यावरून ही वादावादी झाली. त्यात वरिष्ठ अधिकाºयांचा गैरसमज झाला व आमचा अपमान झाला, असे सांगत ते बैठक सोडून निघून गेले.
स्वतंत्र कार्यालय देऊनही वाद कायमच
समितीच्या नवनियुक्त सदस्यांनी आम्हाला आमचे स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र अधिकारी हवेत, अशी मागणी केल्यानंतर प्रशासनाने समितीसाठी स्वतंत्र कार्यालय दिले आहे. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या जागेत हे कार्यालय आहे. सदस्य सचिव म्हणून राज्य सरकारने स्वतंत्रपणे नियुक्त केलेले अधिकारी निवृत्त झाल्यानंतर आता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाºयांकडे याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. स्वतंत्र कार्यालय व स्वतंत्र अधिकारी दिल्यानंतरही उद्यान विभाग व प्राधिकरण यांच्यातील वाद संपायला तयार नाही, हेच यातून दिसून आले आहे.
गैरसमजातून काही वाद
काही दुय्यम अधिकाºयांमध्ये फोन करण्यावरून शाब्दिक वाद सुरू होते. त्यातून काही गैरसमज झाले असावेत; मात्र सर्व काम एकत्रितपणेच होणार असून ६० हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार आहोत.
- अशोक घोरपडे,
मुख्य उद्यान अधीक्षक
मतभेद मिटवण्यात येतील
काहीही वाद झाले नाहीत. दोन विभाग एकत्र आले, की असे काही होत असते. ३० हजार खड्डे खोदण्याचे काम एकत्रितपणेच झाले आहे. अपमान वगैरे काहीच नाही. कोणामध्ये मतभेद असतील, तर ते मिटवण्याचा प्रयत्न करू.
- गणेश सोनुने,
प्रभारी सदस्य सचिव, वृक्ष
प्राधिकरण समिती