बडवे, खान, शिंदे यांना पुरस्कार
By admin | Published: April 26, 2017 04:21 AM2017-04-26T04:21:46+5:302017-04-26T04:21:46+5:30
लक्ष्मीबाई हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या
पुणे : लक्ष्मीबाई हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मीरा बडवे, झरिना खान आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कारांची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम, खजिनदार बी. एम. गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर श्रीवास्तव, विश्वस्त अॅड. एन. डी. पाटील उपस्थित होते. मंदिर वर्धापन दिनी १५ जून रोजी सेंट्रल पार्क येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
आज (दि. २६) सायंकाळी ६ वाजेपासून दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोगरा, चाफा, केवडा, लिली यांसारख्या शोभिवंत फुलांची आरास करून दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव करण्यात येणार आहे. या वेळी दत्तमहाराजांना फुलांचा पोशाख, अलंकार आणि फुलांचा मुकुट करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ७ वाजता ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर हलवाई आणि कुटुंबीयांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात येणार आहे.