दिवसाढवळ्या भर चौकात हातातून पळवली पैशाची पिशवी; तब्बल ३ लाख गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 03:31 PM2021-10-01T15:31:58+5:302021-10-01T15:39:13+5:30
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील घटना; दोन युवकांवर गुन्हा दाखल
शिक्रापूर: शिक्रापूर ता. शिरूर येथील शिवसेना उपतालुका प्रमुख हॉटेल चालकाच्या हातातील तब्बल तीन लाख रुपये चोरल्याची घटना घडली आहे. दुचाकीहून आलेल्या दोघांनी दिवसाढवळ्या गर्दीच्या भर चौकातून हातातून पिशवी हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले आसून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील पारोडी ता. शिरूर येथील हॉटेल व्यावसायिक तसेच शिवसेना शिरूर तालुका उपप्रमुख रोहिदास शिवले हे शिक्रापूर येथील पाबळ चौकातील एक्सिस बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आपल्या मुलासह आलेले होते. त्यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. त्यांनतर त्यांचा मुलगा दोन लाख रुपये घेऊन गेला. रोहिदास शिवले हे त्यांच्या जवळील पिशवीमध्ये तीन लाख रुपये ठेवून दुचाकीहून पैसे घेऊन चालले होते.
अचानकपणे दोन युवक तोंडाला रुमाल बांधून दुचाकीहून त्यांच्या जवळ येत शिवले यांच्या हातातील पैशांची पिशवी घेऊन भरधाव वेगाने चाकण चौकाच्या दिशेने पळून गेले. यावेळी शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता येथील काही सिसिटीव्ही मध्ये सदर दोन अज्ञात चोरटे कैद झाले असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत रोहिदास बाजीराव शिवले वय ५२ रा. शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आसून शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यानवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत आहे.