‘त्या’ बालगृहाला मिळणार अधीक्षक!
By admin | Published: April 7, 2015 05:35 AM2015-04-07T05:35:39+5:302015-04-07T05:35:39+5:30
शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात महिना अखेरपर्यंत वर्ग २ चे निवासी अधीक्षकपद नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महिला व
शिरूर : शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात महिना अखेरपर्यंत वर्ग २ चे निवासी अधीक्षकपद नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी यशास्विनी सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या शिष्टमंडळास दिली़ ‘लोकमत’ने या प्रश्नी सातत्याने आवाज उठवल्याचा ऊहापोह शिष्टमंडळाने यावेळी केला़
बालगृहात २००८ पासून वर्ग-२ चे अधीक्षकपद रिक्त असून, यामुळे मुलींच्या समस्यांत सातत्याने भर पडत असल्याबाबत तसेच मागील वर्षी (२०१४) दोन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याबाबत शिष्टमंडळाच्या वतीने चव्हाण यांना अवगत करण्यात आले़ याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात याचा उल्लेख करताना वर्ग-२ चे अधीक्षकपद तत्काळ नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली़ या वेळी बोलताना फाउंडेशनच्या प्रमुख दीपाली शेळके म्हणाल्या, की अनाथ निराधार घटक असलेल्या बालगृहातील मुलींबाबत शासन प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्याने बालगृहात लैंगिक अत्याचाराची घटना घडली़ मुलींच्या सुरक्षिततेबाबत निवासी अधीक्षिका अत्यावश्यक असताना गेली सात वर्षे हे पद रिक्त ठेवण्यात आलं़ सात वर्षांपासून या बालगृहात वर्ग-३च्या अधीक्षिकेची नियुक्ती असून, त्या निवासी राहात नसल्याचे वास्तव आहे़
निवासी अधीक्षिका नसल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर आला़ कर्वेनगर येथील दोन मुली या बालगृहात दाखल झाल्यानंतर त्या काही दिवसांतच भरदिवसा बालगृहातून पळून गेल्याची घटना घडली होती़
याप्रकरणी तत्कालीन अधीक्षिका व काळजीवाहकास निलंबितही करण्यात आले होते़ हा प्रकार केवळ निवासी अधीक्षिका नसल्याने घडला. असा प्रकार घडूनही शासन वर्ग - २चे अधिक्षकपदाबाबत गंभीर नव्हते. याबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविला. शेळके यांच्यासह नम्रता गवारी, संगीता मल्लाव, शशिकला काळे, सुरय्या पठाण आदी फाउंडेशनच्या पदाधिकारी या वेळी उपस्थित होत्या़ (वार्ताहर)