अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ता म्हणजे बाहरी मल्होत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:27+5:302021-05-23T04:10:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मानवी जीवन हे खूप मौल्यवान आहे आणि ते कसे जगले पाहिजे याचा वस्तूपाठ बाहरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मानवी जीवन हे खूप मौल्यवान आहे आणि ते कसे जगले पाहिजे याचा वस्तूपाठ बाहरी मल्होत्रा यांनी घालून दिला. एकाचवेळी अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार करून त्यांनी जीवनाचे योग्य संतुलन राखले,” या शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विकफिल्ड उद्योगसमूहाचे प्रमुख बाहरी मल्होत्रा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बाहरी मल्होत्रा श्रद्धांजली सभेचे आयोजन जनसेवा फाउंडेशनने केले होते. डॉ. विजय भटकर म्हणाले की, बाहरी यांचा अध्यात्माचा दांडगा अभ्यास होता. राष्ट्रउभारणीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याबाबत ते आग्रही असत. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, माझी आणि बाहरी यांची १९७२ पासून मैत्री होती. माझ्या महाविद्यालयातील बाहेरील देशांतील विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी ते खास आमंत्रित करीत. ‘फ्रिडम फ्रॉम हंगर’ हा त्यांचा ध्यास होता.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, उद्योजक या नात्याने त्यांना जगातले सर्व बरे-वाईट अनुभव आले होते. परंतु, त्यांनी आपल्या मनाची निर्मळता कधीच सोडली नाही. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या सरिता यांनी सांगितले की, बाहरीजी खऱ्या अर्थाने जीवन जगले. केंद्राच्या प्रकल्पांची ते आस्थेने चौकशी करीत. जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख डॉ. विनोद शहा, ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई, गुरुराज मुतालिक, जयसिंग पाटील, मुकेश मल्होत्रा, मीना शहा, सुषमा चोरडिया, उर्वशी सहानी, अश्विनी मल्होत्रा, वर्धमान जैन, जयप्रकाश श्रॉफ, नम्रता भाटिया, विठ्ठल काटे, मदन बाफना आदींनी बाहरी मल्होत्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजेश शहा यांनी आभार मानले. जयदेव नाईक यांनी सूत्रसंचालन केले.