वंचित बहुजन विकास आघाडी पुण्यात सर्व जागांवर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 05:39 PM2019-05-28T17:39:55+5:302019-05-28T17:41:49+5:30
पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवारांना जोरदार लढत दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ...
पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवारांना जोरदार लढत दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शहरातील आठही विधानसभा मतदारसंघामधे उमेदवार उभे करण्याचा निर्णय आघाडीच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वंचित बहुजन आघाडीची चिंतन बैठक मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात झाली. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अग्रहावरुन आठही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय आघाडीचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी जाहीर केला. महिला शहराध्यक्ष अनिता चव्हाण, अनिल शिंदे, नवनीत अहिरे या वेळी उपस्थित होते.
शहरात भाजपाचे ८ आमदार आहेत. असे असले तरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या परिसरात वंचित आघाडी आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या शिवाय शहरातील काही पेठा आणि वस्त्यांमध्ये मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय असल्याने शहरात परिवर्तन करण्याची संधी वंचित आघाडीला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी या बैठकीत बोलून दाखवली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांना लोकसभा निवडणुकीत ६४ हजार ७९३ मते मिळाली आहेत. त्यातही वडगावशेरी भागातून तब्बल २१ हजार ८४ मते जादव यांना मिळाली आहेत. त्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघातून ११,३७६, पर्वती १०,६३४ आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधे १४,६९९ मते वंचितला मिळाली आहेत. कोथरुडमधे ४,४७० आणि कसब्यातून २ हजार ४७१ मते वंचितला मिळाली आहेत.