Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 10:19 AM2024-05-29T10:19:58+5:302024-05-29T10:20:06+5:30

'बाळा' ला त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी या सर्वांना अटक झाली होती

Bail application by employees including owners of Cozy Black hotel The hearing will be held today for Pune Porsche Accident | Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

Pune Porsche Accident: कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर बुधवारी (दि. २९) सुनावणी होणार आहे. 'बाळा' ला त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी या सर्वांना अटक झाली होती.

अपघातानंतर बाळाचा बाप विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचा मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर), ब्लॅक पबचा मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम) आणि ब्लॅकच्या बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना या गुन्ह्यात अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अग्रवालला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेले नमन भूतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे आणि जयेश गावकर यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी (दि. २९) सुनावणी होणार आहे.

बाळाच्या बापाला अन् आजोबाला ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी

बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार यांना चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ससूनच्या प्रकरणानंतर दोघांचा एकत्रित तपास करणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितल्यावर न्यायालयाने त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Web Title: Bail application by employees including owners of Cozy Black hotel The hearing will be held today for Pune Porsche Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.