तस्करीप्रकरणी महिला आरोपीचा जामीनअर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:53+5:302021-07-21T04:09:53+5:30
पुणे : नार्कोटिक्स सेलच्या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी महिलेकडून ४७ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. या घातक ...
पुणे : नार्कोटिक्स सेलच्या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी महिलेकडून ४७ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. या घातक अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी महिला आरोपीचा जामीन अर्ज अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यांतर्गत (एनपीडीएस) विशेष कोर्टाने फेटाळला. विशेष न्यायाधीश अजित मरे यांनी हा आदेश दिला.
सीमाशुल्क विभागाच्या नार्कोटिक्स सेलला मार्च महिन्यात कामशेत परिसरात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. या आरोपीकडे ४७ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन सापडल्याने कोर्टाने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. आरोपीने जामिनावर मुक्तता होण्यासाठी अर्ज केला होता. नार्कोटिक्स विभागाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. संदीप घाटे यांनी या जामिनाला विरोध केला. बचाव पक्षातर्फे आरोपीचा गुन्ह्याशी संबंध नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. त्याला विशेष सरकारी वकील घाटे यांनी हरकत घेत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवााड्याचे दाखले दिले. साक्षीदारांना प्रभावित करून सुनावणीत अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपीला जामीनावर मुक्त करता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणी अॅड. श्वेता आरुडे व अॅड. आदित्य पाटील यांनी काम पाहिले.
....