सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून खंडणी उकळणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला
By नम्रता फडणीस | Published: August 25, 2023 06:11 PM2023-08-25T18:11:59+5:302023-08-25T18:12:56+5:30
हा प्रकार 8 ते 25 डिसेंबर दरम्यान चिंचवड भागात घडला...
पुणे : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत एका औषध विक्रेत्याकडून तब्बल 5 लाख 58 हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीचा जामीन डी. पी. रागीट न्यायालयाने फेटाळला. सुरेश जसाराम चौधरी (वय 32 रा.संत तुकाराम नगर, एंंथॉनी गार्डन जवळ पिंपरी) असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे.
हा प्रकार 8 ते 25 डिसेंबर दरम्यान चिंचवड भागात घडला. याप्रकरणी मांगीलाल घिसाराम चौधरी (रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी सुरेश चौधरी याने सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन, ओळखपत्र दाखवून फिर्यादीच्या मेडिकलमधून दिलेल्या औषधामुळे पेशंट मरणार आहे. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन अटक होणार असल्याची भीती घालत ब्लॅकमेल करुन वेळोवेळी 5 लाख 58 हजार रुपये खंडणी उकळली आहे.
तसेच इतर औषध विक्रेत्यांचीही फसवणूक केली आहे असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपीने बनावट सीबीआयचे ओळखपत्र नष्ट केले आहे. तसेच खंडणीची रक्कम वसूल झालेली नाही. आरोपीवर यापूर्वीही गुन्हा दाखल आहे असा युक्तिवाद अँड अगरवाल यांनी केला. हा युक्तिवाद ग्राहय धरीत न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.