पोटच्या ३ महिन्यांच्या मुलीचा खून करणाऱ्या आईचा जामीन फेटाळला
By नम्रता फडणीस | Published: August 12, 2022 04:34 PM2022-08-12T16:34:36+5:302022-08-12T16:34:48+5:30
महिलेने तीन महिन्यांचे बाळ अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची खोटी तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात केली होती.
पुणे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या आईचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तीन महिन्यांचे बाळ अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची खोटी तक्रार तिने येरवडा पोलीस ठाण्यात केली होती.
पल्लवी बाळू भोंगे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे जामीन अर्ज फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तिचा अर्ज फेटाळला.
२३ ऑक्टोबर २०२१ रोजी हा प्रकार घडला. पोलीस चौकशीदरम्यान तिने बाळाचा जन्म, पित्याच्या नावाबाबत विसंगत उत्तरे दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता घटनेच्या दिवशी ती तिच्या १३ वर्षीय मुलासह हातात एक पिशवी घेऊन जाताना आढळून आली. बाळाचा मृतदेह याच पिशवीत मुळा-मुठा नदीपात्रात विटेच्या साह्याने बांधून टाकल्याचे पोलीस तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने तिच्याविरुद्ध खून व पुरावा नष्ट करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणात, तिने जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपीविरुध्द परिस्थितीजन्य पुरावा असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, त्याच प्रकारची पिशवी, वीट व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा त्यांचा मुलगा यांचा खून करण्याचा उद्देश व अनैतिक संबंधातून बाळ जन्मल्याने होणारी अवहेलना टाळण्यासाठी त्यांनी हा गुन्हा करत पुरावा नष्ट केल्याचे ॲड. अगरवाल यांनी युक्तिवादादरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.