वडिलांचा खून करणाऱ्या मुलाचा जामीन फेटाळला
By नम्रता फडणीस | Published: December 7, 2023 07:09 PM2023-12-07T19:09:58+5:302023-12-07T19:10:16+5:30
मुलाने दारूच्या नशेत वडिलांचा खून केला होता
पुणे: दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून वडिलांचा गळा दाबून खून करणाऱ्या मुलाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांच्या न्यायालयाने फेटाळला. ओंकार रवी क्षीरसागर (वय २७, रा. घुले पाटील कॉलनी, मांजरी ब्रुद्रुक) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे.
याबाबत, ५२ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवी सूर्यभान क्षीरसागर (वय ५२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ९ मे २०२३ रोजी हा प्रकार घडला. वडिलांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने ओंकार याने वडील रवी यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून करत घरातून निघून गेला. सायंकाळी मृताची पत्नी घरी आल्यानंतर त्यांनी पती रवी यांस दवाखान्यात नेले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदन अहवालात रवी यांचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाले.
आईने मुलाकडे याची चौकशी केल्यानंतर ओंकार याने मारहाणीसह खुनाची कबुली दिली. या प्रकरणात, जामीन मिळावा यासाठी ओंकार याने न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याला जामीन दिल्यास तो पुराव्यामध्ये छेडछाड करू शकतो तसेच, आई आणि भावाला फितूर करू शकतो. गुन्ह्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आरोपीने यापूर्वीही वडिलांना मारहाण केली आहे. शेजारी त्या घटनांचे साक्षीदार आहेत. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्यामध्ये जन्मठेप अथवा मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याने आरोपीचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.