परदेशी पळून जाण्याच्या शक्यतेने जादूटोण्याद्वारे फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला
By विवेक भुसे | Published: January 28, 2024 03:27 PM2024-01-28T15:27:05+5:302024-01-28T15:27:26+5:30
न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य करून व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी महिलेचा जामीन फेटाळला. रोया ऊर्फ सीमा नादीर नईमा आबादी (३५, रा. कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी भारतीय तसेच परदेशी नागरिक आहे. तिला जामीन मिळाल्यास ती भारतातून इराण किंवा इतर देशांमध्ये पळून जाण्याची शक्यता आहे. पुराव्याशी छेडछाड करणे आणि इतर फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता आरोपीला जामीन मंजूर करता येत नसल्याचे कारण देत न्यायालयाने तिचा जामीन फेटाळून लावला.
याप्रकरणी शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी याच्यासह सहाजणांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या तीन पोलिस ठाण्यात ४ गुन्हे दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण सहा कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. यातील आरोपी रोया नईमा आबादी हिने जामिनासाठी अर्ज केला होता.
फिर्यादीच्या वतीने जामीन अर्जाला विरोध करताना ॲड. अमेय सिरसीकर व ॲड. महेश झवर यांनी सांगितले की, तक्रारदाराने गुंतवलेल्या रकमेची ती लाभार्थी आहे. ती भारतीय तसेच इराणी नागरिक आहे. तिला जामीन मंजूर झाला तर ती भारतातून इराण किंवा इतर देशांमध्ये पळून जाण्याची शक्यता आहे. काही सहआरोपी अजूनही फरार असून, जामीन मिळाल्यास ती त्यांना पळून जाण्यास मदत करेल.
सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर यांनी गुंतवणूकदारांनी आरोपींसोबत गुंतवलेली एकूण रक्कम कोट्यवधी रुपये आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या इतर आरोपींचा ठावठिकाणा अर्जदाराला माहीत आहे. यापूर्वी दाखल केलेला तिचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद केला. ताे ग्राह्य धरून न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.