पुण्यात तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीस जामीन, तरुण मदतीला आल्याने वाचला होता जीव
By नम्रता फडणीस | Published: October 2, 2023 05:57 PM2023-10-02T17:57:44+5:302023-10-02T17:58:52+5:30
अटक केलेल्या आरोपीला सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे....
पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून सदाशिव पेठेत सिनेस्टाइल एका तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर जामीन मिळाला आहे. अटक केलेल्या आरोपीला सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.
शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१ , डोंगरगाव, ता. मुळशी) असे जामीन झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने ॲड. अभिषेक किसन हरगणे, ॲड. स्वप्नील लहू चव्हाण आणि ॲड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, तपास अधिकारी बोलवतील त्यावेळी तपासास हजर राहणे, कारागृहातून बाहेर आल्यानंतर सात दिवसांत पासपोर्ट जमा करणे, या अटींवर जामीन मंजूर केला आहे.
२७ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पीडित २० वर्षीय तरुणीने याबाबत विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला.