फसवणुकीच्या गुन्ह्यात मोक्का लागलेल्या तीस वर्षीय महिलेला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:05+5:302021-08-22T04:13:05+5:30
पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत अटक केलेल्या एका ३० वर्षीय महिलेला साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकणे, ती ...
पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत अटक केलेल्या एका ३० वर्षीय महिलेला साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकणे, ती संबंधित गावातील रहिवासी असल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र दाखविणे आणि नियमित कोर्टात हजर राहाणे या अटींवर ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांना हा आदेश दिला.
खंडू तानाजी गव्हाणे (रा. अण्णापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार शिरूरमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला पोलिसांनी जानेवारीत मोक्कांतर्गत कारवाई करून अटक केली होती. गव्हाणे त्यांच्या भावासोबत मोटारसायकलवरून गाव तांदुळी (ता. शिरूर) येथे म्हैसखरेदीसाठी निघाले होते. त्यांच्याबरोबरच आरोपी महिलेचा नातेवाईक भाऊसाहेब बबन पवार त्याच्या मोटारसायकलवरून निघाला होता. पवार व फिर्यादी गव्हाणे लघुशंकेसाठी थांबले. दरम्यान, पवार फोनवर कोणाशी तरी बोलत असताना, सात ते आठ अनोळखी लोक व दोन महिला तेथे आल्या आणि त्यांनी गव्हाणे यांना मारहाण करून यांच्या जवळील १ लाख ८० हजाराची रक्कम व मोबाईल काढून घेतला. तेव्हा पवार याने गव्हाणे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून गव्हाणे यांना पवार यांच्याकडून फसवणूक झाल्याचा संशय आला व त्यांनी २० फेब्रुवारीला पवार याच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पवारला अटक केली. दरम्यान, पवारने गुन्हा कबूल केला. आरोपी महिलेसह इतर साथीदारांनी हा गुन्हा केल्याचे पवार याने पोलिसांना सांगितल्यामुळे आरोपी महिलेला मोक्कांतर्गत अटक करण्यात आली.
आरोपी महिलेच्या वतीने ॲड. मिलिंद पवार व ॲड. विश्वास खराबे यांनी जामिनासाठी अर्ज केला. आरोपी महिला ही तिच्या ८ महिन्यांच्या बाळासमवेत कारागृहात आहे. तिच्यावर पूर्वीचा एकही गुन्हा नाही. ती महिला कुठल्या गुन्हेगारी टोळीची सदस्य आहे हे शिरूर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे संबंधित महिला आरोपीला मोक्का कायदा लावणे व मोक्का कायदा लागत नसताना मोक्कांतर्गत कारवाई करून अटक करणे ही पोलीस कारवाई संशयास्पद आहे, असा युक्तिवाद ॲड. मिलिंद पवार यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करीत महिलेला जामीन मंजूर केला.
----------------------