तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणातील सहभागी आरोपीस जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:22+5:302021-08-25T04:15:22+5:30
पुणे : तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणातील सहभागी आरोपीस न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ...
पुणे : तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणातील सहभागी आरोपीस न्यायालयाने ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेड़ाऊ यांनी हा आदेश दिला.
श्रीकांत साठे असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी 4 जणांवर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझान अन्सारी असे मयत तरुणाचे नाव आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्याला लक्ष्मीपार्क महम्मदवाडी भागातील टेकडीवर एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा कॉल आला. ही माहिती त्यांनी वानवडी पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत तरुणाच्या आईने मुलगा 8 जुलैपासून घरी आला नसल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. पोलिसांना तपासात अझान याने आरोपींच्या अवैध दारूविक्री धंदा आणि गुटका विक्रीसंदर्भात माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याचा राग मनात धरून आरोपींनी लक्ष्मीपार्क जवळील टेकडीवर अझान याला नेत त्याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपी साठे हा देखील या गुन्हयात सहभागी आहे. आरोपी यावर गंभीर स्वरूपाचा दोषारोप असून, प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यास जामीन मंजूर करु नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. मात्र, हा आरोपी फक्त २० वर्षांचा असून, त्यावर आधीचे कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. आरोपी मयत व्यक्तीसह हजर असल्याबाबत प्रथमदर्शनी पुरावा नाहीं. दोषारोपपत्रानुसार आरोपीकडून मयत व्यक्तीचा जप्त केलेला मोबाइल वगळता इतर कुठलाही पुरावा नाही. ही रिकव्हरी देखील साशंक आहे असा युक्तिवाद आरोपींचे वकील ॲड. अक्षय बडवे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
-----------------