बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे जमीन खरेदी केल्याप्रकरणी चार जणांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:57+5:302021-09-02T04:19:57+5:30

पुणे : रायवूड (लोणावळा) येथील खरेदी केलेली जमीन बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून विक्री करण्यात आली. खरेदी केलेल्या त्या जागेवर ...

Bail granted to four persons for purchasing land through fake power of attorney | बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे जमीन खरेदी केल्याप्रकरणी चार जणांना जामीन

बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे जमीन खरेदी केल्याप्रकरणी चार जणांना जामीन

googlenewsNext

पुणे : रायवूड (लोणावळा) येथील खरेदी केलेली जमीन बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून विक्री करण्यात आली. खरेदी केलेल्या त्या जागेवर एका बांधकाम कंपनीने बांधकामाला सुरुवात केली. त्यावर तक्रारदाराने आक्षेप घेत लोणावळा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातील कंपनीच्या चार जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा निकाल दिला.

सुमीत चक्रवर्ती, आशिष बजाज, प्रकाश जैन आणि भारत जैन अशी जामीन मंजूर केलेल्या बांधकाम कंपनीच्या संचालकांची नावे आहेत. एका ६२ वर्षीय महिलेने आठ जणांविरुद्ध लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार यांनी लोणावळ्यातील रायवूड या ठिकाणची जमीन २००५ साली खरेदी केली होती. या मिळकतीत त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. एका रो हाऊसमध्ये ते राहत होते. खरेदी मिळकतीतील १६ रो हाऊसेस तोडून त्या जागी त्यांनी नवीन इमारत बांधण्याचे ठरविले. लोणावळा नगरपरिषदेस बांधकामाचा नकाशा मंजूर करून घेतल्यानंतर त्यांनी बांधकाम सुरू केले होते. २००९ पर्यंत त्यांच्या इमारतीचे स्ट्रक्चर पूर्ण झाले होते. दरम्यानच्या त्या कामानिमित्त अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलांकडे गेल्या. २१ आॅगस्ट २००९ ते ११ जुलै २०१९ दरम्यान दहा वर्षे त्या तिथे वास्तव्यास होत्या. त्यांना नातेवाइकांकडून माहिती मिळाली की त्यांच्या मिळकतीमध्ये बांधकाम सुरू आहे. युसूफ अली कुरेशी याने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून तक्रारदाराची मिळकत स्वत:च्या लाभासाठी २०१० साली अनिल चांदवाणी यांना विकली. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी ही मिळकत एका बांधकाम कंपनीला विकली. या बनावट खरेदी-विक्री प्रकरणात युसूफ अली कुरेशी, तारा सीताराम दुप्पड, सतीश महादेव थोरणे, अनिल चांदवाणी यांच्यासह चार संचालकांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. संचालकांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. संचालक हे प्रामाणिक खरेदीदार आहेत. सर्व मोबदल्याचा त्यांनी भरणा केला आहे, असा युक्तिवाद संचालकांच्या वतीने अॅड. लुंकड आणि अॅड. अमित राठी यांनी केला. तो मान्य करून २५ आॅगस्टला न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

------------------------------

Web Title: Bail granted to four persons for purchasing land through fake power of attorney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.